
>> उलेश खंदारे
असं म्हणतात की, एकदा चेहऱयाला रंग लागला की, तो उतरता उतरत नाही. हा रंग चेहऱयाचा कायापालट करून टाकतो. कलावंतांचा कायापालट घडवणारी ही कलावंत मंडळी नेहमीच पडद्याआडून आपले कसब दाखवत असतात. रंगरंगोटी या सदरातून हे रंगभूषाकार आपल्या भेटीला!!
चाळीस वर्षांपूर्वी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक सादर व्हायचं तेव्हा दिलीप प्रभावळकर यांनी कशी रंगभूषा केली असेल, याचा अभ्यास केला, मात्र मला माझ्या पद्धतीने डिझाईन केलेली चेटकीण दाखवायची होती. सहसा चेटकीण म्हटलं की, भीती वाटते, मात्र या नाटकातली चेटकीण ही माणसाळलेली आहे. कोणी तिला ताई म्हणतं, कोणी तिला म्हातारी म्हणतं. त्यामुळे तिला मला गोंडस दाखवायचं होतं. त्यामध्ये कुरळ्या केसांची रचना असलेला विग तयार करणं, तिच्या कपाळावरील टिळा, तिचं उग्र रूप न दाखवता तिला थोडसं सौम्य दाखवणं अशा बारीकसारीक अभ्यासातून चिंची चेटकीण साकार झाली. सुरुवातीला पाऊण तास, त्यानंतर अर्धा तास आणि आता पंधरा मिनिटांत संपूर्ण मेकअप होऊ लागला आहे. चेटकीणीची भूमिका करणारा अभिनेता वैभव मांगले हा एक उत्तम कलाकार आहेच शिवाय त्याला स्वतःला मेकअप करण्याची आवड आहे. एखाद्या कलाकाराला मेकअप करण्यापूर्वी कलाकाराची त्वचा कोणत्या प्रकारची आहे, याचा अभ्यास रंगभूषाकाराने करायलाच हवा. जास्त घाम, एसी यामध्ये मेकअप टिकेल याचीही दक्षता घ्यायला हवी. एखाद्याच्या चेहऱयाला जर इजा झाली असेल तर त्या कलावंताचा पावडर बॉक्स, स्पंज वेगळाच ठेवला पाहिजे. माझी भेट ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांच्याशी झाली. वामन केंद्रे यांच्या आशीर्वादामुळे कृष्णा बोरकर यांच्या सोबत राहण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून रंगभूषा शिकू लागलो. आजपर्यंत पस्तीस नाटकं व्यावसायिक नाटकं आणि बेचाळीस प्रायोगिक नाटकं मी माझ्या रंगांनी रंगवलेली आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रभरात रंगभूषा कार्यशाळाही घेत आहे.



























































