बॅगचोरीमुळे तो बनला भिक्षेकरू, मालाडमधील तरुणाची कुटुंबीयांशी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रेन प्रवासात मोबाईल व अन्य साहित्य असलेली बॅग चोरीला गेली. बॅग चोरी झाल्याने त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याने तो भुकेने व्याकुळ झाला. भूक आवरत नसल्याने तो रस्त्यात भिक्षा मागू लागला. भिक्षा मागत असताना मालाड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या त्या मनोरुग्ण तरुणाची मालाड पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून आणली.

गुरुवारी मालाड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल हे गस्त करत होते. तेव्हा एसव्ही रोडवर एक तरुण भिक्षा मागत असल्याचे महिला पोलीस हवालदार कोमल जाधव यांच्या लक्षात आले. तो तरुण काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे तो पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत नव्हता.  तो तरुण भुकेने व्याकुळ झाल्याने त्याला जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर जाधव यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तो तरुण मूळचा नांदेडचा रहिवासी असून एका होमिओपॅथिक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात तो शिकत होता. त्याची ट्रेनमध्ये बॅग चोरीला गेली. त्या बॅगेत त्याचा मोबाईल होता. मोबाईलमध्ये त्याच्या आईवडिलांचे नंबर होते. त्याला नंबर आठवत नसल्याने तो बेचैन झाला. भुकेसाठी तो भिक्षा मागू लागला. वरिष्ठ निरीक्षक डी. चव्हाण यांच्या पथकातील महिला उपनिरीक्षक मनीषा कागलकर यांनी नांदेडच्या तामसा पोलीस ठाण्याशी संपर्क केला. तो तरुण बेपत्ता असल्याचे समोर आले. त्याच्या वडिलांकडे पोलिसांनी विचारपूस केली. तो तरुण हा मानसिक आजाराने त्रस्त आहे. दीड महिन्यापूर्वीदेखील तो तरुण घरातून निघून गेला होता. त्या मुलाचे वडील शिक्षक असून त्याला घेण्यासाठी ते मुंबईत आले. त्या मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले.