
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली आहे. 2021 च्या जनगणनेचा अहवाल अद्याप प्रकाशित व्हायचा आहे. तेव्हा प्रकाशित होण्याच्या मार्गावर असलेल्या अहवालात जातीआधारित जनगणनेचा समावेश असावा असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील निवडणूक सभेवेळी पंतप्रधानांना 2011 च्या जाती-आधारित जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्यास सांगितल्यानंतर खरगे यांचे पत्र आले.
‘जातीआधारित जनगणना होत नाही तोपर्यंत मला भीती वाटते की अर्थपूर्ण सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण कार्यक्रमांसाठी, विशेषत: ओबीसींसाठी आवश्यक असलेला विश्वसनीय डेटाचा बेस अपूर्ण आहे तेव्हा अशी जनगणना केंद्र सरकारची जबाबदारी आहे’, असं ते म्हणाले.
खरगे पुढे म्हणाले, ‘मी हे देखील निदर्शनास आणू इच्छितो की 2021 मध्ये नियमित दशवार्षिक जनगणना केली जाणार होती परंतु ती अद्याप घेण्यात आलेली नाही. ती तात्काळ करावी आणि सर्वसमावेशक जातीआधारित जनगणना त्याचा अविभाज्य भाग बनवावी अशी आमची मागणी आहे’.
जातीआधारित जनगणनेवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्ला
कोलार येथील सभेवेळी, राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना 2011 च्या जातीआधारित जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्यास सांगितले आणि आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवण्याची मागणी केली.
देशातील जनतेला ओबीसी, दलित आणि आदिवासी किती टक्के आहेत याची माहिती द्यावी, असे ते म्हणाले.
‘पंतप्रधान, तुम्ही ओबीसींबद्दल बोला. तो डेटा सार्वजनिक करा. देशात किती ओबीसी, दलित आणि आदिवासी आहेत ते देशाला कळू द्या’, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना ओबीसी आणि एससी/एसटीच्या कल्याणाची खरी चिंता असेल तर त्यांनी आकडेवारी जाहीर करावी आणि जातीच्या जनगणनेवर आधारित आरक्षण लागू केले पाहिजे.
अन्यथा, हे पंतप्रधानांनी ओबीसी, दलित आणि आदिवासींचा अपमान केल्यासारखे होईल, असे ते म्हणाले.




























































