जनतेच्या कमाईची हप्त्यांमध्ये लूट सुरू, इंधन दरवाढीवरून खरगे यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग तिसऱ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकार इंधन दरवाढ करून सामान्य जनतेच्या कमाईची हप्त्यांमध्ये लूट करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

X वर एक पोस्ट करत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पार गेलेत. ते म्हणाले की, “पेट्रोल आणि डिझेलवर दररोज १,००० कोटी रुपयांचा केंद्रीय कर लादूनही भाजपची भूक शमलेली नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होते, तेव्हा त्यांनी त्याचा फायदा जनतेला दिला नाही, उलट त्यांची लूटच केली.”

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचा संदर्भ देत खरगे म्हणाले, “जेव्हा हे संकट आले, तेव्हा हे लोक निवडणुकांमध्ये व्यस्त होते. निवडणुका संपल्यानंतर त्यांनी लोकांना बचतीचे आणि त्यागाचे उपदेश दिले आणि अवघ्या ८ दिवसांत तीन वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले.”

मल्लिकार्जुन खरगे यांनी इतर देशांचे उदाहरण देत मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “जेव्हा पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले आणि पंतप्रधान मोदी हिंदुस्थानींना ‘सर्व काही ठीक आहे’ असे सांगत होते, तेव्हा इतर देश आपल्या नागरिकांना दिलासा देत होते.”

  • इटली: इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात.
  • ऑस्ट्रेलिया: उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १७ रुपयांची कपात.
  • जर्मनी: तेलावरील कर कमी करून इंधन दरात १७-१९ रुपयांची कपात.
  • ब्रिटन व आयर्लंड: नागरिकांना आर्थिक मदत आणि कर कपातीचा दिलासा.

आपल्या पोस्टच्या शेवटी खरगे यांनी पंतप्रधान मोदींना सवाल केला. “मोदीजी सांगा, या हप्त्यांमध्ये होणाऱ्या लुटीचा वाटा कोणाकोणाला मिळत आहे? तुम्ही इतकी तडजोड का करत आहात? या सरकारमधील खरे संकट हे नेतृत्वाचे संकट आहे, आणि हे आता १४० कोटी हिंदुस्थानींना लक्षात आले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.