
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण तालुक्यातील चौके गावची ग्रामदेवता भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला.
सकाळी देवीची विधीवत पूजा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर मानकऱ्यांनी देवीची ओटी भरल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या ओट्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नवसफेड व नवीन नवस बोलण्यास व दर्शनास सकाळपासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या. पाषाणरुपी देवीचे सजलेले रूप भाविक डोळ्यात साठवत होता.
मंदिराच्या गाभा-यात करण्यात आलेली आकर्षक व मनमोहक सजावट भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. तर संपूर्ण मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने उजळला होता. मिठाई, खेळणी यासह अन्य दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली होती. रात्री पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उशिरा चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर झाला.
शनिवार १ डिसेंबर रोजी आंबेरी येथील सकलेश्वर देवाचा जत्रोत्सव साजरा होणार आहे. हा जत्रौत्सव ‘बहीण-भाऊ’ भेट म्हणून ओळखला जातो. संपूर्ण आंबेरी गावाला भेट देऊन बहीण भराडी देवीची पालखी सकलेश्वराच्या मंदिरात जाते नंतर जत्रोत्सवाला सुरुवात होते. जत्रोत्सावामध्ये हजारो भाविक सहभागी होतात.




























































