शेकडो ग्रामस्थांची रेशन पुरवठा कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस आणि थम मशीनमध्ये बिघाड झाल्याने लाभार्थींना रेशनच मिळाले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत धडक दिली. शेकडोंच्या संख्येने पुरवठा कार्यालयावर धडकलेल्या ग्रामस्थांचा रुद्रावतार बघून अधिकारी व कर्मचारी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली. आम्हाला धान्य मिळणार की नाही ? आमचा आधार नंबर बरोबर आहे ? आमचे उत्पन्न कमी असताना जास्त दाखवले अशा अनेक प्रश्नांचा भडिमार ग्रामस्थांनी यावेळी केला. तसेच ५० टक्के धान्य ऑफलाइन पद्धतीने देण्यात यावे अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून ऑफलाइन पद्धतीने ग्रामस्थांना धान्य पुरवठा करणार असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पाच महिने दक्षता समितीची बैठक न घेतल्यानेच ग्रामस्थांना धान्यासाठी पुरवठा शाखेसमोर रांगा लावाव्या लागल्या असा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला.

राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने या महिन्यापासून ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे रास्त धान्य दुकानदारांनी याची कार्यवाही करण्यास सुरवात केली. मात्र रास्त धान्य दुकानदारांना दिलेल्या ई-पॉस, थम मशीनमध्ये असलेल्या त्रुटी दूर न झाल्याने रास्त धान्य दुकानात धान्य नेण्यास येणार्‍या लाभार्थ्यांना धान्यच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत धडक देत याचा जाब विचारला. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे चार-चारवेळा देऊनही त्यांची नावे ई-पॉस मशीनमध्ये आलेली नाहीत. शिवाय थम मशीनमध्ये लाभार्थ्यांचे थमच येत नसल्याने धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगण्यात आले.