
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर कडाडून हल्ला केला आहे. जनतेत फूट पाडणे, गुंडगिरी करणे, सीबीआय, इन्कमटॅक्स यांची भीती दाखवणे हीच भाजपची कामे असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत कधीही जातीपातीचे राजकारण झालेले नाही. मात्र, भाजपने त्याची सुरुवात केल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला. भाजप सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र घेत नाहीत. तसेच हिंदुमध्येही ते जातीपातीच्या नावाखाली फूट पाडत आहेत. पंजाबमध्येही भाजपने तेच केले आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. आता भाजप बंगालमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
काहीजण बांग्लादेशी बंगाली आहेत. तर काहीजण मूळचे बंगाली आहेत, असे जनतेत पसरवत ते बंगालमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते बंगालमध्ये बंगाली नागरिकांनाच एकमेकांविरोधात भडकावत आहेत, असे त्या म्हणाल्या. जनतेत भांडणे लावत त्यांच्या फूट पाडणे हेच भाजपचे काम आहे. या निवडणुकीत त्यांनी विकासाचा मुद्दा घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपवाले जनतेचे कोणेतही काम करत नाही. गुंडगिरी करत लोकांना धमकावणे, भांडणे लावत फूट पाडणे, दंगली घडवणे, सीबीआय इन्कम टॅक्स यांची भीती दाखवणे हीच कामे भाजपकडून करण्यात येत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. बंगालमध्ये कमी ताकद असलेली भाजपा सर्वशक्तीनिशी निवडणुकीत उतरत आहे. सत्तापरिवर्तन करत सत्तेत येण्याचा दावाही भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर धर्म, जात, पातीचे राजकारण करत जनतेला भाजप घाबरवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.



























































