विरोधकांची एकजूट भाजपला ‘झिरो’ करणार, नितीशकुमार, तेजस्वी, ममता बॅनर्जी यांची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या दृष्टीने आज एक पाऊल पुढे पडले आहे. जदयूचे सर्वेसर्वा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि महत्वपूर्ण चर्चा केली. विरोधी पक्षांना एकत्रित येण्यासाठी कोणाच्याही ‘ईगो’चा प्रश्न येत नाही. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला ‘झिरो’ करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वी नितीशुकमार, तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन विरोधकांच्या एकजुटीबाबत महत्वपूर्ण चर्चा केली होती. आज कोलकाता येथे त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.

सकारात्मक चर्चा झाली -नितीशकुमार
आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. भाजपला देशाच्या विकासाची नाही तर स्वतःच्या प्रचाराची चिंता आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी सर्व विरोधी पक्षांनी एका व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. त्याकरिता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूका लढवल्या पाहिजेत, असे नितीशकुमार यांनी सांगितले.

आमच्यात कोणताही ‘ईगो’ नाही – ममता बॅनर्जी
मीडियाचा वापर करून खोटा प्रचार करून चुकीचे नरेटिव्ह आणि गुंडांचा वापर करून भाजप हिरो बनली आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला ‘झिरो’ करणे हेच आमचे लक्ष्य आहे. विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी आमच्यात कोणताही ‘ईगो’चा प्रश्न नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ‘जेपी’ आंदोलनाची सुरुवात बिहारपासून झाली होती. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची पहिली बैठक बिहारमध्ये झाली पाहिजे. यातून एकतेचा संदेश जाईल, अशी विनंती मी नितीशकुमार यांना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.