ममता बॅनर्जीचे पुतणे अभिषेक यांची आज ‘ईडी’समोर चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे व तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) उपस्थित राहणार आहेत. कोळसा तस्करीसंदर्भात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. अभिषेक यांच्या पत्नी रुचिरा बॅनर्जी यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. परंतु कोरोनाचा दाखला देत त्यांनी आपली चौकशी घरीच करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

अभिषेक बॅनर्जी हे आज सायंकाळी नवी दिल्लीला रवाना झाले. ‘‘नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेतही सांगितले होते आणि आताही सांगतो. आपण 10 पैशांचाही बेकायदा व्यवहार केलेला नाही. त्यासाठी कोणत्याही सीबीआय किंवा ईडीच्या चौकशीची गरज नाही. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याशिवाय भाजपाला कोणतेही काम उरलेले नाही. कोळसा तस्करीत आपला सहभाग ‘ईडी’ने सिद्ध करून दाखवला तर आपण गळफास लावू,’’ असे सांगत बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

सुवेंदू अधिकारी यांनाही समन्स
पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते व भाजपा आमदार सुवेंदू अधिकारी यांनाही त्यांचे अंगरक्षक शुभब्रत चक्रवर्ती यांच्या मृत्यू प्रकरणी राज्याच्या सीआयडीने समन्स बजावले आहे. चक्रवर्ती यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी चक्रवर्ती यांच्या पत्नीने चौकशीची मागणी केली होती.