
सावत्र मुलासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेची तिचा नवरा आणि सावत्र मुलांनीच हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. या महिलेची ओळख पटू नये म्हणून तिला विवस्त्र करण्यात आलं होतं. तिचं शिर धडावेगळं करून बोटंही छाटण्यात आली होती. तरीही पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या हत्येचा उलगडा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता मटौंध येथील चमरहा या ठिकाणी मध्य प्रदेशच्या सीमेनजीक एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहावर शिर नव्हतं. ते जवळपास 50 मीटर लांब फेकण्यात आलं होतं. या कामी पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेतली आणि काही तासांत 4 जणांना अटक केली.
हा मृतदेह तपासल्यानंतर तिची ओळख पटली होती. तिचं नाव माया देवी असं होतं. ती मध्य प्रदेशच्या छतरपूर येथील गौरीहार इथे राहणाऱ्या रामकुमार अहिरवार याची पत्नी होती. रामकुमारचा माग काढल्यानंतर माया देवी हिने त्याच्याशी दुसरं लग्न केल्याचं पोलिसांना समजलं. रामकुमार याला आधीच्या लग्नापासून दोन मुलगे आहेत. सूरज प्रकाश (22) आणि छोटू उर्फ ब्रजेश (19) अशी त्यांची नावं आहेत. माया देवीचे सूरज प्रकाशसोबत अनैतिक संबंध होते. ती ब्रजेशलाही आपल्याशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होती आणि तसं न केल्यास बलात्काराचा आरोप करण्याची धमकीही देत होती.
या प्रकाराला कंटाळलेल्या सूरज आणि ब्रजेशने ही बाब रामकुमारला सांगितली. हा प्रकार कळताच रामकुमार याने तिच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार रामकुमार, सूरज प्रकाश, ब्रजेश आणि रामकुमारचा पुतण्या उदयभान यांनी 25 सप्टेंबर रोजी महिलेला पिकअप बोलेरोमध्ये बसवलं आणि चमरहा गावाच्या सीमेवर आणलं. तिथे सामसूम जागा पाहून तिला गाडीतून उतरवलं आणि गळा दाबून तिची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचं मुंडकं छाटलं आणि ते काही अंतरावर फेकून दिलं. तिचे कपडे काढण्यात आले आणि बोटंही छाटण्यात आली होती. मात्र, श्वानपथकाने माग काढल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.

























































