सहा वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या नराधमाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूषण पारळकर । नरसीफाटा

मांजरम येथील एका सहा वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिची निघृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात नायगांव पोलीसांना यश आले आहे. निष्पाप चिमुकलीचा जीव घेणारा क्रुरकर्मा आरोपी श्रावण गजभारे यास न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घरासमोर खेळणारी ऋतिका वंजारे ही सहा वर्षीय बालिका अचानक बेपत्ता झाली होती. वंजारे यांच्या घरासमोरच राहणारा श्रावण गजभारे हा युवक ऋतिकाला घेवून गावाबाहेर जातांना काही महिलांनी बघितले होते. अखेर शोधाशोध करुनही ऋतिकाचा तपास न लागल्याने वंजारे कुटूंबाच्या फिर्यादीवरुन संशयीत आरोपी श्रावण गजभारे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अधिक तपासाअंती गावालगतच्या एका विहीरीत चिमुकल्या ऋतिकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मयत ऋतिकाच्या मृतदेहाची नायगांव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. परंतु शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवण्यात आला. घडलेला घटनाक्रम व प्राथमिक पुरावे लक्षात घेता वंजारे कुटूंबाच्या फिर्यादीवरुन नराधम युवक श्रावण गजभारेवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी श्रावण गजभारे हा मोठ्या शिताफीने फरार झाला होता. पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे यांनी तपासाची वेगवान मोहीम हाती घेतली. याचवेळी फरार श्रावण गजभारे हा बिलोली व धर्माबाद सीमेवरील चिरली येथे दबा धरुन बसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाँ वळगे, मुस्तापूरे, धोंडगे आदींच्या पथकाने शनिवारी रात्री नराधम श्रावणला चिरली येथून जेरबंद केले. निष्पाप ऋतिकाचा खून करण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या श्रावण गजभारेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या दरम्यान हत्येचे कारण उघडकीस येण्याची शक्यता आहे.