
पाच हजार रुपये घेऊन बारावीची बनावट गुणपत्रिका तयार करणाऱयाला मालवणी पोलिसांनी अटक केली. रिषभकुमार दुबे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन बनावट गुणपत्रिका पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. दुबे हा एका खासगी कंपनीत रिकव्हरी एजंट असून झटपट पैशांसाठी तो बनावट कागदपत्रे बनवून देतो.
मालवणी परिसरात एक जण बनावट बारावीच्या गुणपत्रिका बनवून देत असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक नीलेश साळुंखे यांना मिळाली. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव यांच्या पथकातील नीलेश साळुंखे, शिव शंकर भोसले, पाटील आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून दुबेला बारावीची गुणपत्रिका आणि आधारकार्ड बनवण्यास सांगितले.
दुबे हा बनावट गुणपत्रिका आणि आधारकार्ड घेऊन मालवणी येथे आला. पोलिसांनी दुबेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बारावीची गुणपत्रिका जप्त केली. दुबे हा पाच हजार रुपयांत बनावट गुणपत्रिका तर तीन हजारांत बनावट आधारकार्ड बनवून देत असायचा. तो कोरल ड्रॉच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवत होता. त्याच्याकडून पोलिसांनी तीन बनावट गुणपत्रिका आणि लॅपटॉप जप्त केला आहे.





























































