वडिलांच्या उपचारासाठी कर्ज घेणाऱ्याची जागा बळकावली, तरुणाची आत्महत्या

वडिलांच्या उपचारासाठी हातउसने पैसे घेतलेल्या तरुणाची जागा बळकावून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अनिल बापू कामठे (वय 36, रा. फुरसुंगी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिलने याच्याकडून सचिन बबन गलांडे (वय 45, रा. वडगाव शेरी ) याने काही पैसे घेतले होते. त्यासाठी त्याने त्याची जमीन गहाण ठेवली होती. ही जमीन अनिलने बळकावली होती.

सचिनचे वडील आजारी असल्याने त्याला तातडीने पैशांची गरज होती. यासाठी त्याने 2 वर्षांपूर्वी अनिलला गाठून त्याच्याकडून उसनवारीवर पैसे घेतले होते. याबदल्यात त्याने त्याच्याकडे असलेल्या 5 गुंठे जमीन गहाण ठेवली होती. ही जागा अनिलने परस्पर विकून टाकली होती. सचिनने जेव्हा अनिलकडे त्याची जागा परत मागितली तेव्हा त्याने सचिनला दमदाटी केली होती. त्याने सचिनच्या डोक्यावर बंदूकही ताणली होती. अनिलकडून होणाऱ्या त्रासाला सचिन कंटाळला होता. या त्रासामुळे त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाचा सखोल तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या