
पोलीस आणि लष्कर भरतीची तयारी करतानाच झटपट पैसा कमावण्यासाठी अन्य दोघांच्या साथीने दुचाकी चोरायला त्याने सुरुवात केली. दीड-दोन महिन्यांत तिघांनी नऊ गाडय़ा चोरल्या, पण वेळीच घाटकोपर पोलिसांनी त्यांना दणका देत तिघांना गजाआड केले. त्यांच्याकडून पोलिसांनी 12 दुचाकी हस्तगत केल्या.
अंकित मिश्रा (21), किरण पाटील (22), गणेश सावंत (21) अशी आरोपींची नावे असून अंकित हा टोळीचा म्होरक्या आहे. किरण आणि गणेश हे एकाच गावचे असून दोघेही मानखुर्द परिसरात राहतात. अंकित हा काही दिवसांपूर्वी मानखुर्द येथील एका केक शॉपमध्ये कामाला असताना त्याची दोघांशी ओळख झाली. गणेश हा त्याच परिसरात एस बँकेत सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. त्याचबरोबर तो पोलीस आणि लष्कर भरतीची तयारी करत होता. मात्र अंकितने गणेश आणि किरणला दुचाकी चोरी करून झटपट पैसे कमवायची आयडिया दिली. त्या लालसेला भुलून चोरी करण्यास सहमती दिल्यानंतर अंकितने तो पूर्वी ज्या हॉटेलात कामाला होता त्याच हॉटेलच्या मालकाची ऑक्टिव्हा चोरली. त्यानंतर अंकितने घटकोपरमधील त्याच्या मित्राची बुलेट चोरली.
दोन महिन्यांत तिघांनी मिळून नऊ गाडय़ा चोरल्या. या चोरीप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीपी आनंद नेर्लेकर, वरिष्ठ निरीक्षक संजय डहाके, निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे तसेच कोयंडे, पंक, देवार्डे, म्हस्के आदींच्या पथकाने गुह्यांचा तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आरोपी कोण ते स्पष्ट झाले. त्यानंतर तिघांना अटक करून गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या तीन गाडय़ा आणि चोरलेल्य नऊ गाडय़ा अशा 12 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यात तीन बुलेट, सहा ऑक्टिव्हाचा समावेश आहे.
कागदपत्रे देतो सांगून स्वस्तात विक्री
किरण हा आधी सांगलीत होंडा शोरूममध्ये कामाला होता. त्यामुळे चावी नसेल तरी गाडी सुरू करायची त्याला माहिती होती. त्याआधारे किरण गाडी सुरू करून द्यायचा आणि अंकित ती घेऊन जायचा. त्यानंतर कागदपत्रे नंतर देतो असे सांगून काही गाडय़ा त्यांनी 20 ते 25 हजारांत सांगली, सातारामध्ये विकल्या होत्या. दुचाकी चोरीच्या नादात गणेशने त्याचे पोलीस व्हायच्या स्वप्नाचा मात्र चुराडा केला.




























































