वडिलांनी लिव इनला केला विरोध, सूड म्हणून मुलीवर बलात्कार व हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सात वर्षांच्या शाळकरी मुलीला लिव इनमध्ये राहण्याची जबरदस्ती करणाऱ्या २० वर्षीय तरुणाविरोधात मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याचा सूड म्हणून आरोपी तरुणाने त्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली व तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याची भयंकर घटना दिल्लीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. रोहित असे आरोपीचे नाव आहे.

रोहित गुंडप्रवृत्तीचा तरुण असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो संबंधित मुलीच्या कॉलनीत भाड्याने राहायला आला होता. रोहितची मुलीवर वाईट नजर होती. मुलगी शाळेत जात असताना तो रोज तिची वाट अडवायचा. यामुळे मुलीने वडिलांना याबद्दल सांगितले होते. त्यानंतर रोहितने मुलीशी मैत्री केली व तिचे अपहरण केले. नंतर तो दुसरीकडे भाड्याने घर घेऊन मुलीसोबत राहू लागला. मुलीला त्याने धमकावल्याने तिने याबद्दल कोणासही काही सांगितले नाही.

दरम्यान आपल्या मुलीला रोहितने फसवले असून तो तिच्याबरोबर लिव इनमध्ये राहत असल्याचे मुलीच्या वडिलांना कळले. यामुळे पोलिसांना घेऊन मुलीचे वडील रोहितच्या घरी पोहोचले. वडिलांना पाहून मुलीने रडण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सर्वांसमक्ष रोहितचा अपमान केला. त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले व मुलीला घेऊन ते निघून गेले. पण अपमानाच्या आगीत जळणाऱ्या रोहितने मुलीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलगी शाळेत जात असताना त्याने तिचे पुन्हा अपहरण केले व बलात्कार करून तिचा मृतदेह तिच्या घराजवळ फेकून दिला.