नेरळच्या तरुणीला ‘एआय’ने ‘बोहल्या’वर चढवले, लग्नाचा बनावट फोटो व्हायरल करत बदनामी

‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स किती घातक आहे याची प्रचीती देणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका विकृताने तरुणीच्या नावाने फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यानंतर ‘एआय’च्या मदतीने तरुणीचे लग्न झाल्याचे बनावट फोटो व्हायरल करत तिला थेट बोहल्यावर चढवले. ‘एआय’च्या या दुरुपयोगामुळे पीडित तरुणीला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीने तिच्या नावाचे आणि तिचे फोटो असलेले इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले. मात्र हे अकाऊंट ओपन करताच तिच्या पायाखालील जमीन सरकली. त्या अकाऊंटमध्ये तिने स्वतःचे लग्न झालेले खोटे फोटो पाहिले. तसेच त्या मॉर्फ फोटोखाली बदनामीकारक मजकूरदेखील पोस्ट करून ते व्हायरल केल्याचे पाहून तरुणीला धक्काच बसला.

सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू
नेरळ पोलीस अधिकारी शिवाजी धावले यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करण्यासाठी वापरलेले आयपी अॅड्रेस, वापरलेले उपकरण व तांत्रिक तपासाच्या मदतीने विकृताचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे.