
>> मंगल गोगटे
भूपृष्ठाखाली असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचून पाणी वापरासाठी उपलब्ध करण्यासाठी ज्या संरचना तयार केल्या जातात त्यापैकी विहीर ही एक सर्वात जास्त प्रचलित संरचना आहे. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असून आड, कूप, गोल विहीर, चौकोनी विहीर, दीर्घिका, नलिका कूप, पोखरण (पुष्करणी), बारव, बुडकी, रिंगवेल, विंधन विहीर अशा विविध 11 प्रकारांत बांधता येते.
आड विहीर अरुंद, चोकोनी आणि खोल असते. कूपदेखील अरुंद आणि खोल असते, परंतु विहिरीचा आकार गोल असतो. दीर्घिका ही विहीर लांबट असते. नलिका कूप वापरून खोल असलेल्या पाणी पातळीपर्यंत जाऊन पाणी उपयोगात आणले जाते. पोखरण चौकोनी असून त्याला पायऱया असतात. बारव या विहिरीला उत्तम दगडी बांधकामाच्या पायऱया असतात. बुडकी या विहिरीला फक्त पावसाळ्यात पाणी असतं. याला जिवंत झरे नसल्याने नंतर ती कोरडी पडते. विंधन विहीर योग्य जागा निवडून यंत्राद्वारे खणून जलसाठय़ापर्यंत जाऊन तेथील पाणीसाठा वापरात आणला जातो. रिंगवेल ही लहान व्यास असलेली विहीर काँक्रीट रिंगा वापरून बनवली जाते.
आतापर्यंत मी विहिरी पाहिल्या आहेत त्यापैकी बहुतेक गोल आकारातच आहेत. पांडवकालीन विहिरी किंवा त्यानंतरच्या काळातील विहिरी ज्या आज पाहतो आहोत, त्या चौकोनी किंवा आयताकृती आढळतात, पण जास्त करून सध्या बांधल्या जाणाऱया विहिरी गोलाकार असतात. कारण ः
सुरक्षित भूमितीय रचना – भूमितीय रचनेत वर्तुळाकार रचना ही इतर रचनांपेक्षा खूप मजबूत असते. त्यामुळे गोलाकार विहिरीच्या बांधकामात बसवलेल्या विटा किंवा दगड यांना त्यांच्या बाजूच्या विटा किंवा दगड यांना आतील बाजूस कोसळण्यास मज्जाव करतात.
व्यावहारिक दृष्टिकोन – 20 फूट लांबी, 20 फूट रुंदीच्या जागेत 40 फूट खोलीची वर्तुळाकार विहीर बांधताना जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा त्याच व साधारण तेवढय़ाच जागेत चौकोनी विहीर बांधताना जास्त खर्च येतो (कारण सामान जास्त लागतं.), मात्र त्या जास्त खर्चाच्या तुलनेत जास्त पाणीसाठा वाढत नाही.
स्वच्छता आणि निगा – स्वच्छता राखताना वर्तुळाकार जागेची स्वच्छता उत्तम राखता येते, पण कोपरे असलेली जागा स्वच्छ राहतेच असं नाही.
काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला असला तरी आजही विहीर खोदायची म्हटले की, समोर येतो तो पानाडय़ा. ग्रामीण भागात भूगर्भाचा अभ्यास करण्याची शास्त्र्ाशुद्ध पद्धती काय याचा विचार न करता थेट पानाडय़ाला आमंत्रित केले जाते आणि भूगर्भातील पाण्याचा शोध घेतला जातो. यामुळे अनेक ठिकाणी पाणीही लागलेले आहे. यादरम्यान, पानाडय़ा हा शेतामधील आपटय़ाचे झाड, शमीचे झाड आहे त्या ठिकाणी विहीर खोदण्यास सांगतो. एवढेच काय ज्या ठिकाणी चार झाडांचा संगम आहे अशा ठिकाणी ओलसरपणा अधिक असला तरी विहीर खोदली जाते. यामागे कोणतेही शास्त्र नसले तरी ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन हा प्रकार वाढलेला आहे. ज्या पद्धतीने पानाडय़ाच्या सांगण्यावरून विहीर किंवा बोअरवेल बनवली जाते त्याचप्रकारे जानेवारी महिन्यातच अधिक प्रमाणात विहिरी खोदल्या जातात.
जानेवारी महिन्यातच अधिक विहिरी खोदल्या जातात यामागे एक कारण आहे. पावसाळा संपल्यानंतरचा हा जानेवारी महिना. या महिन्यात पाण्याची पातळी ही फार खोल गेलेली नसते आणि ती उथळही नसते. पावसाळ्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये भूगर्भात पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबलेली असते, पण या प्रक्रियेमुळे भूगर्भ खोदण्यासाठीची क्रिया ही सोपी असते. कारण जमीन ही नरम झालेली असते. त्यामुळे या महिन्यात विहिरीचे खोदकाम सुरू केले तर मार्च-एप्रिलपर्यंत खोदकाम करण्यास सोपे जाते. यासाठी कोणता काळ हा मर्यादित नाही तर नागरिक हे शुभ मुहुर्त ठरवून विहिरीचे खोदकाम करतात.
नैसर्गिकदृष्टय़ा ज्या जमिनीमध्ये पाण्याचे संचयन होते अशाच ठिकाणी पाणी लागण्याची शक्यता असते. यामध्ये भेगा असणाऱया, दगडांमध्ये सांधे असणाऱया किंवा मुरमाचा स्थर असणाऱया जमिनीमध्येच पाणी जास्त मुरते. ज्या ठिकाणी भूजलाचे संचयन असते त्याला शास्त्र्ााrय पद्धतीमध्ये पाण्याचा ‘स्टोरेज झोन’ असे म्हटले जाते. या पाण्याच्या स्टोरेज असलेल्या जमिनीतच विहिरी खोदण्याचे प्रमाण अधिक असते. अशा ठिकाणी विहिरी घेतल्याने बारमाही पाणी टिकून राहते. विहीर खोदताना त्या ठिकाणचा दगडाचा प्रकार जो की नरम असावा म्हणजे जास्तीत जास्त खोलीपर्यंत विहीर खोदता येते.





























































