
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण खैदा-कातवड येथे वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कातवड येथील ग्रामस्थांच्या आंबा कलम व काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे १५ ते २० एकर माळरानावरील गवताचे क्षेत्र व येथील ग्रामस्थाच्या आंबा काजू कलम बागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थाच्या शर्तीच्या प्रयत्नाने व मालवण नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. मालवण खैदा कातवड येथील वीज वितरणच्या ट्रान्सफार्मर वरील विद्युतभारीत वाहिनीला जोडण्यात आलेल्या चीनी मातीची डिक्स फुटल्याने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. वाऱ्याचा वेग असल्याने या आगीने रौद्ररूप धारण करत येथील माळरानावरील गावत व ग्रामस्थांच्या आंबा, काजू कलम बागेत प्रवेश केला. यात रामचंद्र सीताराम नलावडे यांची सुमारे ३० आंब कलमे, १० काजू कलमे, किशोर चंद्रकांत पवार यांची ९० आंबा कलमे, ४० काजू कलमे, पाईप लाईन आगीत जळून गेली, पवार यांच्या घराच्या बाजूला आलेली आग ग्रामस्थांनी आटोक्यात आणली अन्यथा जळाऊ लाकडाना आग लागली असती तर मोठे संकट निर्माण झाले असते. मात्र सीताबाई सीताराम कदम यांची ३० मोठी आंबा कलमे, तर सुरेश परब यांची काजू कलमे, लाकडे आगीत पूर्ण जळून गेली. यात ग्रामस्थाचे सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात आंबा व काजू कलमे मोहर येण्याच्या वेळी झालेल्या नुकसानी मुळे ग्रामस्थ संकटात आले आहेत. या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
वाऱ्याचा वेग आणि अग्नीचे रौद्ररूप यात सुमारे १५ ते २० एकरच्या माळराणा वरील गवत व आंबा कलम बागाचे नुकसान झाले.आग आटोक्यात आणण्यासाठी निलेश बागवे, यशवंत चव्हाण , किशोर पवार,मंगेश धुरी, हनुमंत धुरी, संतोष नलावडे,अनिल न्हीवेकर, संदीप भोजने, सुनील परब, कमलाकर कदम, दिगंबर परब, आप्पा दळवी, गणेश परब, मनीष चव्हाण, राजू भोगावकर, शुभम नक्ते, आदी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. मालवण नगरपालिकेच्या अग्नी शामक बंबा द्वारे माळरानावर पसरलेल्या आगीला शमविण्यात आले.विद्युत पोलवरील चीनी मातीची डिक्स फुटल्यानेच आग लागली असल्याचे वीज वीतरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घटना स्थळी पाहणीसाठी बोलावण्यात यावे अशी भूमिका कर्मचाऱ्यां जवळ केली. मात्र वीज वितरणचे अधिकारी आजारी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या नुकसानी बाबत सोमवारी कोळंब ग्रामपंचायत येथे नुकसानग्रस्त ग्रामस्थ व वीज वितरण अधिकारी, सरपंच, सदस्य, तलाठी, पोलीस पाटील याची बैठक घेऊन या नुकसानी बाबत तोडगा काढण्यात येणार असल्याचे अनिल न्हिवेकर,व संदीप भोजने यांनी सांगितले.
































































