पाच महिन्यांनंतरही मणिपूर हिंसाचारग्रस्त, आंदोलनकर्त्यांनी भाजप कार्यालय पेटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये दोन दिवसांपासून पुन्हा हिंसाचार उफाळून आला. जुलैमध्ये अपहरण झालेल्या दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाले आणि आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून उग्र निदर्शने केली. या भडक्याचे वणव्यात रूपांतर होण्याच्या भीतीने सरकाने अखेर आज मणिपूर अशांत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी डोंगराळ प्रदेशात सशस्त्र्ा दल विशेष अधिकार कायदा अर्थात ‘अफ्स्पा’ लागू करण्यात आला आहे. यातून 19 विशिष्ट पोलीस ठाण्यांचा परिसर वगळण्यात आला आहे.

इंफाळ, लेंफेल, सिटी, सिंग्जमेई, सेकमई, लामसांग, पत्सोई, वांगोई, पोरोमपट, हेंगेंग, लामलाई, इरिलबुंग, लेमखोंग, थोबुल, विष्णुपूर, नांबोल, मोइरोंग, काकचिंग आणि जिरिबम या 19 पोलीस ठाण्यांना ’अफस्पा’ कायद्यातून वगळले आहे.

आज बुधवारीदेखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी झालेल्या चकमकीत काही विद्यार्थी जखमी झाले. तर इंडीजिनस ट्रायबल लीडर्स फोरम या महिलांच्या संघटनेनेही चुराचांदपूरमध्ये निदर्शने केली.

दोन विद्यार्थी हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर हे आपल्या टीमसह इंफाळमध्ये दाखल झाले आहेत.

भाजप कार्यालय पेटवले

मणिपुरात सहा महिन्यांसाठी अफस्पा वाढवल्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी थौबल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला आग लावली. आगीची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयातील सामान जळून खाक झाले. याआधीही भाजप कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या वेळी जमावाने कार्यालयाचे गेट, खिडक्या आणि कार्यालयाबाहेरील कारची तोडफोड केली होती.

दोन दिवसांत काय घडले…

इंटरनेट सुरू करण्यात आल्यानंतर  23 सप्टेंबर रोजी दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाले. जुलैमध्ये संबंधित विद्यार्थी एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱयात दिसले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले.

26 सप्टेंबर रोजी सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांमध्ये चकमक उडाली. यात एका शिक्षकासह 45 विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर 1 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा इंटरनेट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

27 सप्टेंबर रोजी पुन्हा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. पुन्हा विद्यार्थी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाल्याने काही विद्यार्थी जखमी झाले.

महिला, मुलांचा शस्त्र म्हणून वापर

मणिपूरसारखे सुंदर राज्य आज युद्धक्षेत्र बनले आहे. या राज्याचे अक्षम मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींकडे या राज्याला भेट देण्यासाठी वेळ नाही. विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे. तसेच महिला आणि मुलांचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचे त्यानिमित्ताने उघड झाल्याचा आरोपही खरगे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा

मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून तेथील राज्य सरकारने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे जाहीर केले आहे. मणिपूरमध्ये टोकाची हिंसा होत असतानाही केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याचे सौजन्य दाखवले नाही. आता निमलष्करी दले तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तरीही यश येत नसल्याचेच राज्य सरकारच्या घोषणेवरून दिसत आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आसाम–मेघालय सीमावाद पुन्हा पेटला

आसाम आणि मेघालयदरम्यान सुरू असलेला सीमावाद पुन्हा पेटल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. सीमेवरील एका गावात दोन गटांत चकमक उडाली. दोन्ही गट एकमेकांवर सशस्त्र हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटो तसेच व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. मंगळवारचा संपूर्ण दिवस परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.  दरम्यान, दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री ऑक्टोबरमध्ये याप्रकरणी बैठक घेणार आहेत.