
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी हरयाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी व कुमार विश्वास यांची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीमध्ये भाजपकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज तिवारी आणि सपना चौधरी यांच्यामध्ये तब्बल दीड तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नक्की काय झाले हे समोर आले नसले तरी दिल्लीतील काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये सपना चौधरी भाजपची स्टार प्रचारक म्हणून काम करू शकते अशी शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी सपनौ चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या वाडव्या उठल्या होत्या. उत्तर प्रदेश काँग्रेसने तर याचे पुरावेही दिले होते. परंतु सपना चौधरीने मात्र आपण कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही हे स्पष्ट केले होते. तसेच दिल्ली भाजपाध्यक्ष मनोज तिवारी हे संपर्कात असल्याचे तिने सांगितले होते. त्याचवेळी तिची भाजपप्रवेशाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता तिवारी आणि चौधरी यांची भेट झाल्याने याला दुजोरा मिळत आहे. परंतु अद्याप याची घोषणा करण्यात आलेली नाही.
कुमार विश्वास भाजपमध्ये?
आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मनोज तिवारी यांनी कुमार विश्वास यांनी भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. याआधी कुमार विश्वास हे गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवृत्त लष्कर प्रमुख व्ही.के. सिंह यांच्याविरोधात मैदानात उतरणार अशी शक्यता होती. परंतु आता तिवारींनी त्यांची भेट घेत भाजपप्रवेशाची ऑफर दिल्याने त्यांच्यावर दिल्लीमध्ये प्रचाराची धुरा सोपवण्यात येऊ शकते. दरम्यान, अद्याप कुमार विश्वास यांनी या वृत्तांबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.






























































