
सामना प्रतिनिधी । मुंबई
मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या आमदार निवासाची इमारत पाडून त्याजागी ५० मजली व ३५ मजली असे दोन भव्य टॉवर उभे राहणार आहेत. या टॉवरमध्ये आमदारांना एक हजार चौरस फुटांचे फ्लॅट उपलब्ध होणार असून या इमारती २०२१ पर्यंत बांधून पूर्ण केल्या जाणार आहेत.
मनोरा आमदार निवास ही इमारत १९९४ साली बांधण्यात आल्यानंतर अवघ्या २५ वर्षांतच ही इमारत धोकादायक झाली. आमदारांच्या फ्लॅटमधील स्लॅब कोसळू लागले. यामुळे मनोरा आमदार निवास पाडून त्याजागी नवीन इमारती उभारल्या जाणार आहेत. याच्या पुनर्विकासाचे काम एनबीसीसी इंडिया लि. या कंपनीवर सोपविण्यात आले आहे. ही कंपनी ३७३ फ्लॅट असलेले दोन टॉवर उभारणार असून हे दोन्ही टॉवर पुलाच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार आहेत.
– डिसेंबर २०१८ पासून या टॉवरचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. अडीच वर्षांत हे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च नियोजित करण्यात आला आहे.
असे असणार फ्लॅट
आमदारांना मिळणारा एक हजार चौरस फुटांचा फ्लॅट ६०० चौरस फूट जागा त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी आणि ४०० चौरस फुटांची जागा त्यांना भेटण्यासाठी येणाऱया अभ्यागतांसाठी ठेवण्यात येणार आहे. ही रचना अशा प्रकारे करण्यात येणार आहे की जर एखाद्या आमदाराला पूर्ण फ्लॅट एकावेळी वापरायचा असेल तर तसेही करता येणार आहे.





























































