कागद कुरतडून मंत्रालयातील उंदीर करीत आहेत ‘फायलींचा जलद निपटारा’, मंत्रालय पोखरले उंदिरांनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातल्या गतिमान सरकारने जलद गतीने फायलींचा निपटारा करण्याची योजना आखली आहे, पण सध्या मंत्रालयात वाढलेले उंदीरच कागद व फायली कुरतडून ‘जलद गतीने फायलींचा निपटारा’ करीत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एका दिवसात चार मोठे उंदीर मारण्यात आले. मुख्य म्हणजे भाजपचे तत्कालीन आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या कंत्राटातील भ्रष्टाराचाराचे प्रकरण काढल्यानंतर आता उंदीर मारण्याचे कंत्राट देण्याची प्रथाच बंद झाली आहे.

मंत्रालयात सध्या उंदिरांचा सुळसुळाट झाला आहे. आज दुसऱ्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी एका फटक्यात चार उंदीर मारले. हा कार्यक्रम बघण्यासाठी महिला व पुरुष कर्मचारी मोठय़ा संख्येने जमा झाले होते. या उंदिरांनी दुसऱ्या मजल्यावर उच्छाद मांडला होता. फायली, झेरॉक्स पेपर आणि कार्यालयीन पेपर कुरतडून टाकले होते. मंत्रालयाच्या इमारतीची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होते, पण नेमक्या याच खात्यात उंदिरांनी उच्छाद मांडला होता. दुसऱया मजल्यावरील एका कोनाडय़ात तीन-चार बिळांमध्ये उंदरांनी संसार मांडला होता. मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर उंदरांचा संचार आहे. अगदी तळमजल्यावरील पत्रकार कक्षापासून सहाव्या मजल्यावर उंदरांचा मुक्तपणे संचार असतो. एसीच्या यंत्रणेपासून आयटी विभागाच्या वायर अनेकदा उंदरांनी कुरतडल्याचे प्रकार घडले आहेत. उंदरांच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी हल्ली छताला अॅल्युमिनियमचे पत्रे लावले आहेत.

मांजरी उंदरांकडे ढुंकूनही बघत नाहीत
मंत्रालयात गेल्या काही दिवसांत मांजरींची संख्या वाढली आहे. या मांजरींना ‘कॅट फूड’ची दररोज मेजवानी मिळते. प्रत्येक मजल्यावर कागदी डिशमध्ये मांजरांसाठी खाद्य भरून ठेवले जाते. या खाद्यावर यथेच्छ ताव मारल्यामुळे या मांजरी उंदिरांकडे ढुंकूनही बघत नाहीत. मांजरांना खाद्य देऊ नका असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे, पण मांजरप्रेमी कर्मचारी या मांजरांना आवडीने ‘खिलवत’ असतात.

आरोपानंतर कंत्राटच बंद
मंत्रालयामध्ये उंदीर मारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी उंदीर मारण्यासाठी दिलेले कंत्राट व मारलेल्या उंदरांचा हिशोब मांडला होता. या प्रकरणानंतर मंत्रालयात उंदीर मारण्याचे कंत्राट देण्याचे बंद केले. आता फक्त पिंजरा लावला जातो आणि पिंजऱयात सापडलेले उंदीर मंत्रालयाच्या बाहेर नेऊन सोडतात, पण हेच उंदीर पुन्हा मंत्रालयात येत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.