काँग्रेसचे अनेक आमदार संपर्कात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

औषध कालबाह्य झाल्यानंतर त्याचा परिणाम होत नाही, तशी स्थिती काँग्रेसची झाली आहे. काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली आहे. यामुळे काँग्रेसचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. परंतु आम्ही चांगल्या प्रतिमेच्या व्यक्तींनाच संधी देऊ, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमरावती येथे बोलताना केले.

अर्थमंत्री मुनगंटीवार बुधवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यांनी अमरावती विभागातील 33 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या नियोजनासाठी बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. मुनगंटीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेला जनतेने भरघोस यश दिले, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता ’छप्पर फाड के’ यश देईल, यात शंका नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्थिती 17 राज्यांमध्ये झाली आहे, ती बघता आता हा पक्ष उभा होऊ शकत नाही. कारण औषधांप्रमाणे आता काँग्रेस व राष्ट्रवादीची एक्सपायरी डेट संपली आहे. यामुळे त्यांचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. परंतु चांगल्या प्रतिमेच्या आमदारांना आम्ही आमच्या पक्षात संधी देऊ. वाईट प्रवृत्तीला भाजपात थारा मिळणार नाही.

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कामाचे मुल्यमापन करावे!

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळविणाऱ्या भाजपच्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल, काँग्रेस नेते माजी खा. नाना पटोले यांनी शंका उपस्थित केली आहे त्याला भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खा. सुनील मेंढे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले वास्तविकता या दोन्ही नेत्यांना या जिह्याने मोठे केले. अनेक वर्षांपासून राजकारण करीत असताना त्यांची राजकीय उंची वाढली. परंतु, मतदारसंघातील समस्या होत्या त्याच आहेत. त्यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारत भाजपला कौल दिला. भाजपला इतकी मते कशी मिळाली, याचा विचार करण्याऐवजी आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत आपण या मतदारसंघासाठी काय केले, याचे मूल्यमापन या नेत्यांनी करावे, असा टोला त्यांनी लगावला. मेंढे यांनी भंडारा येथील विश्राम भवनात आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.