
जीवाची दिवाळी करण्यासाठी हजारो पर्यटक रायगडात आले. त्यांनी समुद्रकिनारे तसेच अन्य स्थळांचा मनमुराद आनंदही लुटला. मुंबईच्या गर्दीपासून या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला, पण परतीच्या प्रवासाने घात केला. मुसळधार पाऊस अचानक सुरू झाला आणि त्याचा फटका रायगड जिल्ह्याला बसला. समुद्रात तीन नंबरचा बावटा फडकल्याने मांडवा-गेटवे जलवाहतूक ठप्प झाली. त्यामुळे बच्चेकंपनीसह असंख्य पर्यटक अलिबागमध्येच अडकले. त्यांनी एसटी स्टॅण्डकडे मोर्चा वळवला, पण तेथेही तुफान गर्दी झाली. आजही पर्यटकांचे अतोनात हाल झाले.
मुंबई, ठाण्याचे पर्यटक हजारोंच्या संख्येने दिवाळी सुट्टीसाठी रायगडात आले होते. अलिबागसह नागाव, वर्सेली, किहीम, काशिद, मुरुड, रेवदंडा येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले. व्यावसायिक, हॉटेलमालक यांचीही चलती झाली. आज कामावर जायचे असल्याने रविवारीच पर्यटकांनी काढता पाय घेतला, पण पावसाने दगाफटका केल्याने ते अलिबागमध्येच अडकले. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेगही वाढला आहे. त्याचा परिणाम जलवाहतुकीवर झाला असून गेटवे ते मांडवा व मांडवा ते गेटवे या दरम्यानची बोट वाहतूक रविवारी व आजही बंद होती. ही वाहतूक २९ ऑक्टोबरपर्यंत खराब हवामानामुळे बंद ठेवण्यात येणार आहे.
– जलवाहतूक बंद झाल्याने चाकरमानी व पर्यटकांनी एसटी बस स्थानकात धाव घेतली. यामुळे अलिबाग व मुरुड एसटी बस स्थानकात प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
– प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना तासन्तास बस स्थानकात रखडावे लागले. मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या बसेस गर्दीने तुडुंब भरल्या
कोस्ट गार्डने गस्त वाढवली
जोरदार वाऱ्याचा वेग आणि वाढलेल्या लाटांच्या पाश्र्वभूमीवर सागरी सुरक्षा दल आणि स्थानिक कोस्ट गार्ड पथकांकडून किनाऱ्यांवर गस्त वाढवण्यात आली आहे. मासेमाऱ्यांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, अनेक ठिकाणी मासेमारी नौका किनाऱ्यावरच थांबवण्यात आल्या आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दापोली किनाऱ्यांवर सुरक्षा दलाकडून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून रोखण्यात आले

























































