Maratha Reservation: जालना- अंबड रोडवर मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन

जालना शहरातील जालना-अंबड रोडवर इंदेवाडी येथे आज 17 फेब्रुवारी शनिवार रोजी सकल मराठा बांधव व महिलांच्या वतीने जालना ते अंबड या मुख्य महामार्गावर ट्रॅक्टर आडवा लावला. तसेच महिला वर्गांनी मुख्य रोडवर चुल पेटवून स्वयंपाक करत रास्ता रोको आंदोलन केले आहे.

या आंदोलनाची प्रमुख मागणी होती की जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा आमदार खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा आंदोलकांनी हे आंदोलन आज इंदेवाडी येथे केले आहे, याप्रसंगी आंदोलकांनी भाजपाचे नेते नारायण राणे यांच्या विरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध या आंदोलनादरम्यान केला आहे.

याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलन ऐकण्याच्या मनस्थितीत नाही मागील एक तासापासून जालना ते अंबड या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलन करणार का? कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस आमरण उपोषणामुळे खालावत चालली आहे याची चिंता राज्यातील कोट्यवधी मराठा समाजाला लागून राहिली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत ठीक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा हीच या आंदोलकांची मागणी आहे. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जालना तहसीलदार छाया पवार यांना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण विषय तात्काळ निकाली काढून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्याची मागणी केली.