
छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर हे मराठा समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करीत आहेत. याचा निषेध आम्ही करतो. बीडच्या सभेत त्यांनी दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान आम्ही स्वीकारत आहोत. समाजाचे मागासलेपण न्यायालयात सिद्ध करत आहोतच. तेच खुल्या चर्चेतही सिद्ध करून दाखवू. त्यावेळी भुजबळ, मुंडे यांनी त्यांचे आरक्षण योग्य असल्याचे सांगायची तयारी ठेवावी. त्यासाठी तारीख आणि वार सांगावा त्यांच्याशी खुली चर्चा करू, अशा शब्दांत सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने आव्हान दिले आहे.
मराठा आरक्षण व ओबीसी नेत्यांची भूमिका यावर मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्यात आली. यावेळी राज्य समन्वयक विराज देसाई, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, राहुल पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, अशोक पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.
विद्यमान सरकार जाती-जातीत फूट पाडण्याचे काम करीत आहे, असा आरोप करून पदाधिकारी म्हणाले, मराठा समाजाला दिलेल्या प्रत्येक आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे व त्यांना आर्थिक पाठबळ देणारे लोक विशेष समाजाचेच आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मदत करतो, असे खोटे सांगू नये. दि. 2 सप्टेंबर 25च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानेच जीआर लागू होणार आहे. ओबीसी मंत्रिमंडळ उपसभेतील ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना दाखले देण्यास विरोध नाही, असे म्हणणारे भुजबळ जीआर विरोधात जातीय तणाव निर्माण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱयांना चर्चेसाठी वेळ देत नाहीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा व्याज व परतवास गेली अनेक महिने बंद असून, महामंडळ बंद पडावे, असाच प्रयत्न सरकारचा आहे. याबाबत आम्ही पालकमंत्र्याकडे अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला. पण त्यांनी केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील इतरांना चॉकलेट वाटून आनंद घेत आहेत; पण आमच्या आयुष्यात विष कालविण्याचे काम करीत आहेत, असा हल्लाबोलही पदाधिकाऱयांनी केला.
मंत्रिमंडळात अनेक मराठा मंत्री आहेत; पण केवळ मतासाठी ते मराठा समाजाचा वापर करीत आहेत. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका व महापालिका निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार घालावा की काय, अशा मनःस्थितीपर्यंत आम्ही आलो आहोत, असे स्पष्ट करून प्रशांत भोसले म्हणाले, भाजपामधील मराठा नेते, कार्यकर्ते सध्या गप्प आहेत. त्यांची ही भूमिका निश्चितच निषेधार्ह अशी आहे.



























































