मराठा क्रांती मोर्चाचे आज ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने आता राज्यातील मराठा समाजाकडून विविध आंदोलने करून मराठा आरक्षणाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. मुंबई तसेच मुंबईलगतच्या शहरांमध्ये आज रविवार 20 सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती महामोर्चा महामुंबईच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईत 20 ते 25ठिकाणी हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात येईल. मराठा बांधव सर्व नियमांचे पालन करीत करोना बाबतची दक्षता (तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर) घेत आपला निषेध नोंदवणार आहेत. मुंबईलगतच्या शहरांमध्येदेखील एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या विभागातील ठरलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला हजेरी लावून आपल्या पुढच्या पिढय़ांकरिताच्या या लढय़ात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, महामुंबई संघटनेकडून करण्यात आले आहे. दादर, लालबाग, गिरगाव, वांद्रे  कलानगर, चेंबूर, वडाळा, मानखुर्द, घाटकोपर आदी सर्वच ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या