Maratha Reservation Row बार्शीत चार मराठा तरुणांनी विष घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाबाबत मिंधे सरकारकडून फसवणूक होत असल्यामुळे मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यातूनच आज बार्शी तालुक्यात चार तरुणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. हिंगोलीत एका तरुणीने जीवन संपवले. सोलापूर जिल्ह्यात मराठा तरुणांनी स्मशानभूमीतच जिवंत चिता समाधी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, राज्यभरात आंदोलनाचा भडका कायम असून आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. गावागावांमध्ये साखळी उपोषण, बंद, कॅण्डल मार्च सुरू आहेत. मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडण्यात आली. नगर-कल्याण, सोलापूर-पुणे महामार्ग आज रोखण्यात आले. पुण्यात मार्टकेयार्ड बंद करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह अर्ध्या मराठवाडय़ात इंटरनेट सेवा बंद आहे. बीड, धाराशीवमध्ये संचारबंदी मागे घेण्यात आली, तरी येथे दुसऱ्या दिवशीही व्यवहार ठप्प होते. राज्यभरात सर्वत्र बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला बुधवारी सात दिवस झाले. या काळात मराठा आरक्षण देण्यासाठी राज्यातील मिंधे सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देगावातील घटनेने खळबळ

सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटलेला असतानाच बार्शी तालुक्यातील देगाव येथील घटनेने खळबळ उडाली. देगाव येथील ग्रामस्थांनी कॅण्डल मार्च आणि रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात रणजित ऋषीनाथ मांजरे, योगेश भारत मांजरे, दीपक सूर्यकांत पाटील आणि प्रशांत मोहन मांजरे हे तरुणही सहभागी झाले होते. आंदोलनाची प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने आंदोलन संपताच या चौघांनी गावाजवळच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. चौघांना उपचारासाठी कर्मवीर मामासाहेब जगदाळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रणजित मांजरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मंगळवारी पंढरपूर तालुक्यात दोन तरुणांनी आत्महत्या केली असतानाच देगावातील घटनेने खळबळ माजली आहे.

स्मशानभूमीमध्येच आंदोलन सुरू

राज्य सरकारच्या निषेधार्थ तळे हिप्परगा येथे राष्ट्रीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी मराठा हिंदू स्मशानभूमीत सरणावर झोपून चिता समाधी आंदोलन सुरू केले आहे. समाधी आंदोलन सुरू करण्यापूर्वी जिवंतपणी अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे, प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार, विशाल भोसले, अंकुश पाटील, नितेश दातखिळे, अमर सुपे, संदीप सिंग, संजय पारवे, विश्वजीत चुंगे, गणेश मोरे यांच्यासह शेकडो मराठा तरुण आणि इतर समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पहिलं कुणबी प्रमाणपत्र लाभार्थ्याने जाळले

सरकारने जुन्या नोंदी आहेत त्या मराठय़ांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर आज धाराशीव जिह्यातील सुमित माने या मराठा बांधवाला पहिले कुणबी प्रमाणपत्र मिळाले. परंतु माने यांनी हे प्रमाणपत्र जाळून टाकत सरकारचा निषेध केला.

मराठा, धनगर आरक्षणासाठी शिवसेना राष्ट्रपतींना भेटणार

मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी त्यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र दिले आहे. शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना हे पत्र दिले आहे. मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे आणि त्यासंदर्भात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आपल्याला 5 किंवा 6 नोव्हेंबर रोजी भेटू इच्छित आहे. राष्ट्रपती महोदयांनी त्यांच्या सोयीनुसार भेटीची वेळ द्यावी, अशी विनंती या पत्रामध्ये  करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश असणार त्यांची नावेही या पत्रात नमूद करण्यात आली आहेत. त्यामध्ये संजय राऊत यांच्यासह खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे.