मैत्रीचे बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी आणि समीरा खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आजवरच्या प्रवासात आम्ही एकमेकींना (तिने मला अधिक) समृद्ध केलं आणि करत राहू…. सांगतेय अभिनेत्री मधुरा वेलणकर.

गेल्या दोन-तीन वर्षांची जवळची वाटायची ती माणसं दूर गेली आणि काही जवळ असलेली, पण अंतर पडलेली माणसं पुन्हा जवळ आली. या सगळ्या उलाढालीमध्ये मला कधीच कुठल्याही निर्णायक तराजूमध्ये न तोलणारी, मला प्रोत्साहन देणारी, अतिशय खऱया सोप्या ठाम मताची, निःस्वार्थी मदत करणारी, अत्यंत चांगल्या मनाची स्वतःच्या ध्येयाकडे अभ्यासपूर्वक, तटस्थपणे, प्रामाणिकपणे पण आनंदाने झेप घेणारी एक लोभस व्यक्ती माझी सखी मला परत मिळाली डॉ. समीरा गुजर.

माझ्यापेक्षा वयाने थोडी लहान, पण कर्तृत्वाने अत्यंत उंच, भाषेची अभ्यासक, हाडाची सूत्रसंचालिका, मेहनती अभिनेत्री आणि एक हवीहवीशी माणूसपण करणारी मैत्रीण. हे सगळं असून तिच्यातला साधेपणा अचंबित करणारा. तिच्या उंचीचं दडपण आपल्याला कधीच येत नाही तर फक्त नितळ अभिमान वाटतो हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्टय़.

मी मराठी विषयात पदवीतर शिक्षण घेताना तिची साथ लाख मोलाची होती. तिनं विश्वास दिला, दिशा दाखवली, मार्गदर्शनही केले. पदवी मिळाल्यावर आनंदही व्यक्त केला आणि त्यातूनच आमच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली.

‘मधुरव – बोरू ते ब्लॉग ’ हे माझ्या कल्पनेतून, समीराच्या संशोधनातून जन्माला आलेल देखणं, तेजस्वी, प्रभावी, आश्वासक स्वप्न. त्याला मूर्त रूप देताना अभिजीतची कल्पकता, कुटुंबाची साथ आणि जाणकारांचे हात लाभले. या पूर्ण प्रवासात इतपं आनंददायी, प्रेरणादायी वातावरण खूप काही शिकवून गेलं. अशा या महत्त्वपूर्ण आणि आगळ्या कार्यक्रमाला लोकांपर्यंत पोहोचवताना अनेक अडचणी येतात. तरीही माझ्या पाठीशी माझा नवरा अभिजीत आणि ही माझी मैत्रीण समीरा कायम बळ देत उभे असतात. लवकरच ‘मधुरव’चा पंचविसावा प्रयोग संपन्न होणार आहे. शिवाय आणखीन दोन नवीन उपक्रम मी आणि समीरा करत आहोत. त्यानिमित्ताने पुन्हा भेटी, पुन्हा गप्पा, पुन्हा ज्ञानप्राप्ती, पुन्हा आनंद वाटय़ाला येणार यासाठी मी उत्सुक आहे. आमच्या या प्रवासात आम्ही एकमेकींना (तिने मला अधिक) समृद्ध केलं आणि करत राहू. आमच्या मैत्रीला कुणाची दृष्ट लागू नये आणि प्रतिभेचा सूर्य तिच्या चेहऱयावर कायम उजळत राहो, हेच विश्वाकडे मागणं!