मेरी कोम, पंघालसह आठ बॉक्सर्सना ऑलिम्पिकचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहा वेळची जगज्जेती एमसी मेरी कोम आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमित पंघालसह आतापर्यंत हिंदुस्थानच्या आठ बॉक्सर्सनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. एशिया/ओसनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत त्यांनी हे यश संपादन केले. ‘सुपर मॉम’ मेरी कोम दुसऱयांदा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या मेरी कोमने एशिया/ओसनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत 51 किलो गटातील सलामीच्या लढतीत थोडा बचावात्मक खेळ केला. दुसऱया फेरीत संघर्षपूर्ण लढतीत तिने विजय मिळवला. तिसऱया आणि अखेरच्या फेरीत मेरी कोमने अनुभवाच्या जोरावर फिलिपीन्सच्या आयरिश मॅग्रो हिचा 5-0 गुणांनी धुव्वा उडवून उपांत्य फेरी गाठली व याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटही बुक केले. पुरुष गटात राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेता अमित पंघालने 52 किलो गटात दक्षिण आशियाई चॅम्पियन फिलिपीन्सच्या कार्लो पालम याचा 4-1 फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. तो प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे, मात्र 57 किलो गटात साक्षी चौधरीला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागल्याने तिचे ऑलिम्पिक पात्रतेते स्वप्न भंगले. तिला दक्षिण कोरियाच्या एम. आएजीकडून 0-5 अशी हार पत्करावी लागली.

ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने सहाजिकच मी आनंदी झालोय. चुलते राज नारायण यांना मी ही उपलब्धी समर्पित करत आहे. मी कार्लो पालमला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत हरवले होते. त्यामुळे त्यांच्यावर कसा विजय मिळवायचा याची रणनीती आखणे मला सोपे गेले. – अमित पंघाल