बाबरीच्यावेळी संयम बाळगला, ज्ञानवापीसाठी बाळगणार नाही, रस्त्यावर उतरून लढण्याची तौकीर रझा याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात वाराणसीतील ज्ञानवापी व मथुरेतील काशी विश्वनाथ मंदिर यावर न्यायालयात कायदेशीर लढा सुरू आहे. या प्रकरणाबाबत आता इत्तेहाद-ए-मिल्लत (IMC) परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान याने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आम्हाला गरजे पुरते नाही, तर आम्हाला आमचा वाटा हवा आहे, असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच बाबरीच्या वेळी संयम बाळगला, मात्र ज्ञानव्यापीसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची धमकी केंद्रातील मोदी सरकारला दिली आहे.

तौकीर रझा खान याने केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तौकीर रजा याच्या मते देशातील केंद्र सरकार जनतेत धर्माची दरी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्ञानवापी प्रकरणावर बोलताना ब्रिटीशांसारख फूट पाडा आणि राज्य करा, असे षडयंत्र भाजपाने सुरू केले असल्याचा आरोप रजा यांनी केला आहे. मौलाना तौकीर रजा याने विद्यमान सरकार तसेच मागील सरकारवर टीका करत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ज्ञानवापीबाबत मौलाना तौकीर रजा म्हणाले की, बाबरी मशिदीबाबत आम्ही संयम बाळगला, मात्र ज्ञानवापीसाठी आम्ही धीर धरणार नाही. इथे जसा हिंदुंबाबत विचार केला जात आहे तसा आमचा ही विचार करण्यात यावा. आमचीही श्रद्धा महत्वाची आहे. याप्रकरणी वकील न्यायालयीन लढा लढतीलचं, पण आम्ही मुस्लीम देखील रस्त्यावर उतरू. आम्हाला आमच्या गरजे पुरते नको असून आमच्या हक्काचे हवे आहे. आमच्या लोकांसाठी आम्हालाच काम करायचे आहे. त्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची आमची इच्छा नसल्याचे, तौकिर रजा यांनी म्हटले आहे.

तौकीर रझा याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्ञानवापी मशीद असो अथवा मथुरेची शाही ईदगाह असो आम्ही मशीद देणार नाही. आज या दोन मशिंदीसाठी वाद सुरू आहेत उद्या लाखो मशिदींची यादी ते घेऊन बसतील, हे आम्ही मान्य करणार नाही. धर्माची जी नशा दिली जात आहे, चरस प्यायला दिला जात आहे, ते खपवून घेतले जाणार नाही. यानंतर पुन्हा एकदा आम्ही मशीद देणार नसल्याचे मौलाना तौकीर रझा खान याने सांगितले.