सर्वधर्मीय भाविकांनी मास्क वापरावेत, महापौरांचे धार्मिक स्थळांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कोरोनावाढीच्या धर्तीवर बुधवारी लोकल प्रवास करून प्रवासी, स्थानकांमधील दुकानात काम करणाऱया कर्मचाऱयांना मास्क वापरण्याचे आवाहन केल्यानंतर आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील धार्मिक स्थळांची आणि प्रमुखांची भेट घेऊन भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस त्या धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत.

मुंबईतील काही विभागांमध्ये वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबईतील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना महापौर किशोरी पेडणेकर भेटी देत असून आज वाळकेश्वर येथील बाबू अमिचंद पन्नालाल जैन संघाला भेट दिली.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यावी यासाठी आचार्य पद्मभूषण रत्नसुंदर सुरी महाराजांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी महापौर म्हणाल्या, कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱया भक्तांनी मास्क लावणे बंधनकारक आहे तसेच जैन आचार्य म्हणून आपणसुद्धा मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांना मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन करावे, अशी विनंती महापौरांनी केली. जैन आचार्य यांनीसुद्धा महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाजहितासाठी, लोकहितासाठी असे आवाहन करणार असल्याचे आश्वासन दिले. महापौरांनी यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनासुद्धा मास्क लावण्याचे आवाहन केले.