एनआयए भाजपची बटीक बनलीय! काश्मिरातील छापेमारीवरून मेहबुबा मुफ्तींचा केंद्रावर निशाणा

जम्मू- काश्मिरातील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) छापेमारीवर पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

जे रांगेत उभे राहण्यास नकार देतात, त्यांना घाबरवण्यासाठी व धमकावण्यासाठी एनआयए ही भाजपची बटीक बनली आहे. ही दुर्दैवी बाब आहे, असे ट्विट त्यांनी बुधवारी सकाळी केले. या माध्यमातून त्यांनी एनआयएच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला.

एनआयएने श्रीनगरमध्ये मानवाधिकार कार्यकर्ता खुर्रम परवेज व ग्रेटर कश्मीर ट्रस्टच्या कार्यालयासह बंदीपूरा आणि बेंगळुरू येथील 10 ठिकाणी छापेमारी केली. दहशतवादी कारवायांना पैसे पुरवल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले. या कारवाईवरून मुफ्ती यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. ही छापेमारी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असंतोषावर केंद्र सरकारने केलेल्या द्वेषपूर्ण कारवाईचे एक उदाहरण आहे, असे ट्विट त्यांनी केले. नजरकैदेतून बाहेर आल्यापासून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू ठेवला आहे. मात्र गेल्या आठवडय़ात राष्ट्रध्वजासंबंधी वादग्रस्त विधान केल्याने त्या स्वतःही मोठय़ा संकटात सापडल्या आहेत

आपली प्रतिक्रिया द्या