अमरावतीत मनोरुग्ण मुलाने केली वडिलांची हत्या

file photo

मनोरुग्ण मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी अमरावतीतील धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये परसोडी गावात घडली. परसोडी गावात रामकृष्ण काळे (वय 70) पत्नी कमल आणि मुलगा धम्मदीपसोबत( वय 34) राहत होते. धम्मदीप हा मनोरुग्ण आहे. तो घरात नेहमी आईवडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे काळे पतीपत्नी त्रासले होते. त्यांनी याबाबत चार दिवसांपूर्वी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

धम्मदीपचा त्रास वाढल्याने तसेच त्याने काही कुरापती करू नये म्हणून काळे यांनी त्याला रविवारी रात्रभर लोखंडाच्या पलंगाला बांधून ठेवले होते. सोमवारी सकाळी धम्मदीपला मोकळे करण्यात आले होते. रामकृष्ण काळे मोबाईलवर बोलत असतानाच अचानक धम्मदीप मागून आला आणि त्याने वडिलांच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. यात रामकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या