
मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बीएमएसच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. मात्र कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पब्लिक रिलेशन (सीसीपीआर) या विषयात विद्यार्थ्यांना 00 आरआर गुण देण्यात आले आहेत. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या निकालावर तब्बल 216 विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला असून युवा सेनेनेदेखील परीक्षा विभाग संचालकांना पत्र पाठवून हा प्रकार निदर्शनास आणला आहे.
विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांत चांगले गुण आहेत. मात्र एकाच विषयात 00 आरआर गुण मिळाले आहेत. युवा सेनेनेदेखील विद्यापीठाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून विद्यापीठातील प्रभारी कारभारामुळेच अशा चुका वारंवार होत असल्याची टीका युवासेनेने केली आहे. युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांना पत्र पाठवून हा गोंधळ निदर्शनास आणून दिला आहे.
विद्यापीठाने सीसीपीआर या विषयाच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन करावे आणि लवकरच सुधारित निकाल जाहीर करावा, अशी मागणीही युवासेनेने केली आहे. विद्यापीठाकडून पेपरची तपासणी ऑनलाइन करण्यात येते. सदर परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक, विषय कोड, पेपर कोड अशी या विषयाची चुकीची माहिती लिहिली आहे. त्यामुळे पेपर कोणत्या विषयाचा आहे हे कळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात त्या विषयाच्या जागी 00 आरआर नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सदर उत्तरपत्रिका ऑफलाइन पद्धतीने पाहण्यात आल्यावर सीसीपीआर विषयासंदर्भात गुणांचा गोंधळ दूर होईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.


























































