
फेसबुकची मूळ कंपनी मेटाने काही काळापूर्वी आपल्या कंपनीत नोकरकपात केली होती. त्यामुळे सुमारे 11 हजार जणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. आता पुन्हा एकदा 10 हजार कर्मचाऱ्यांना मेटा नारळ देण्याच्या तयारीत आहे.
मार्च 2023मध्ये मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग याने नोकरकपातीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि रिअॅलिटी लॅब या मेटाच्या चार कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 10 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे.
मेटाच्या कामगिरीत सुधारणा आणण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत बदल करणं आवश्यक वाटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात या कर्मचाऱ्यावर होणारा खर्च ही एक मोठी बाब आहे. त्यासाठी मेटाने व्यवस्थापकांना तसे बदल करण्याच्या सूचना देऊन अहवाल तयार करण्यास सांगितलं आहे.
त्यासाठी मेटाच्या विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गट बनवण्यात आले होते, त्यांची पुनर्रचना करण्यात येईल. तसंच, कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाला लक्षात घेऊन काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा लागू करता येईल का, यासंबंधीही कंपनीचा विचार सुरू आहे.

























































