
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात यंदाच्या वर्षी 82 इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले असून यात मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 43 इमारतींचादेखील समावेश आहे.
जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार यंदाही पावसाळ्यापूर्वी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या 82 इमारतींमध्ये 2256 निवासी व 480 अनिवासी असे 2736 रहिवासी आहेत. मंडळातर्फे 176 निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटीस बजावली आहे. त्यांच्यापैकी 29 रहिवाशी मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. 36 जणांनी स्वतःची निवाऱ्याची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरित इमारतीमधील रहिवाशांना निष्कासनाची सूचना देण्यात आली असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
2102 रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार
अतिधोकादायक इमारतीमधील 2102 रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे. या इमारतीमधील रहिवाशांना आवश्यकतेनुसार मंडळातर्फे जागा खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येतील व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यात येईल. या रहिवाशांनी इमारती रिक्त करण्यासाठी म्हाडाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.






























































