
पतीच्या निधनानंतर महिलांना उर्वरित आयुष्य जगताना अनेकदा कुटुंब आणि समाजव्यवस्थेकडून मर्यादा येतात, मात्र सर्व रुढी, परंपरांना छेद देत भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथील अक्षय मोरे या तरुणाने कोरोनाने मृत्यू पावलेल्या आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीशी विवाह केला. अशा प्रकारे अक्षयने समाजासमोर एका आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.
म्हसवे येथील रहिवासी मोतेश मोरे यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी स्वाती माने हिच्याशी झाला होता. दोघांचा सुखाचा संसार चालू होता. त्यांना एक गोंडस मुलगाही झाला, मात्र कोरोना संकटात मोतेश आणि त्याच्या कुटुंबियांतील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान मोतेशचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वातीचे पुढे काय? याची चिंता मोरे आणि माने कुटुंबियांना सतावू लागली.
अकाली वैधव्य आलेल्या स्वातीच्या उर्वरित आयुष्याचा विचार करत असताना मोतेशचा लहान भाऊ अक्षय या अविवाहित तरुणाने आपण स्वातीसह तिच्या बाळाला स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याच्या या निर्णयाला दोन्ही कुटुंबियांनी संमती दिली. त्यानंतर हा विवाह सोहळा हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे दोन्ही कुटुंबियांच्या व मित्रमंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. अक्षयच्या या निर्णयाचे कौतुक करत राजनंदिनी फाउंडेशनच्या वतीने या दाम्पत्याचा साडीचोळी, शाल देऊन सन्मान केला.
































































