
एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पुणे आवृत्तीच्या 16 वर्षांखालील मुले, 14 वर्षांखालील मुले आणि 15 वर्षांखालील मुली गटात अनुक्रमे सेठ दगडुराम कटारिया हायस्कूल (गुलटेकडी), सिंहगड सिटी स्कूल (कोंढवा) आणि जय हिंद हायस्कूल संघांनी (पिंपरी) जेतेपद पटकावले.
बुधवारी झालेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत सेठ दगडुराम कटारिया हायस्कूलने अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल (कॅम्प) संघावर 15 धावांनी मात करताना 16 वर्षांखालील गटाची ट्रॉफी उंचावली. प्रथम फलंदाजी करताना कटारिया हायस्कूलला 107 धावांमध्ये रोखण्यात अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलला यश आले. त्यांच्याकडून सलमान शेखने (15 धावांत 4 विकेट) प्रभावी मारा केला. विजयासाठी कटारिया हायस्कूलची भिस्त गोलंदाजांवर होती. प्रज्ञेश ठाणेकर (23 धावांत 3 विकेट) आणि श्रीनिवास जाधवने (39 धावांत 3 विकेट) खेळपट्टीला अनुकूल गोलंदाजी करताना अँग्लो उर्दू बॉईज संघाला 92 धावांमध्ये गुंडाळताना सनसनाटी विजयाची नोंद केली.
14 वर्षांखालील मुले गटाच्या विजेतेपदावर नाव कोरलेल्या सिंहगड सिटी स्कूलच्या अँजल मिकी मिनी स्कूलविरुद्धच्या (हडपसर) 127 धावांच्या दणदणीत विजयात शिवराज सूर्यवंशी चमकला. प्रथम फलंदाजी करणार्या सिंहगड सिटी स्कूलने195 धावांची मजल मारली. त्यात शिवराजच्या 88 चेंडूंतील 79 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. प्रत्युत्तरादाखल, तनय खिंवसरा (16 धावांत 3 विकेट) आणि शिवराजच्या (17 धावांत 3 विकेट) अचूक गोलंदाजीच्या जोरावर अँजल मिकी मिनी स्कूलला 68 धावांवर रोखण्यात सिंहगड सिटी स्कूलच्या गोलंदाजांना यश आले.
आणखी एका एकतर्फी फायनलमध्ये, जय हिंद हायस्कूलने मुलींच्या 15 वर्षांखालील गटात हिंद हायस्कूलने (पिंपरी) आर्यन वर्ल्ड स्कूलचा (वारजे) तब्बल 131 धावांनी पराभव केला.प्रथम फलंदाजी करणार्या जय हिंद हायस्कूलने मुस्कान शेख (49 चेंडूत 43) आणि (शर्वरी खिलारी 33 चेंडूत 39) यांच्या दमदार फलंदाजीमुळे 186 धावा केल्या.आर्यन वर्ल्ड स्कूलच्या फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा डाव केवळ 55 धावांमध्ये आटोपला. जयहिंदकडून शर्वरी (3-7) आणि वैष्णवी सिंग (3-15) यांनी अचूक आणि नियंत्रित मारा केला.
संक्षिप्त धावफलक:(अंतिम फेरी)
14 वर्षांखालील मुले गट
सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा-37.5 षटकांत सर्वबाद 195(शिवराज सूर्यवंशी 79; ओम तांबे 3-44) विजयी वि. अँजल मिकी मिनी स्कूल, हडपसर-22 षटकांत सर्वबाद 68 (आदित्य गिकवाड 29; तनय खिंवसरा 3-16, शिवराज सूर्यवंशी 3-17). सामनावीर:शिवराज सूर्यवंशी.
16 वर्षांखालील मुले गट
सेठ दगडुराम कटारिया हायस्कूल, गुलटेकडी-28.4 षटकांत सर्वबाद 107(कोंडभर चैतन्य 31; सलमान शेख 4-15) विजयी वि. अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, कॅम्प-29.4 षटकांत सर्वबाद 92(मनोजकुमार सरोज 31; प्रज्ञेश ठाणेकर 3-23, श्रीनिवास जाधव 3-39). सामनावीर:प्रज्ञेश ठाणेकर
15 वर्षांखालील मुली गट
जय हिंद हायस्कूल, पिंपरी-17 षटकांत 2 बाद 186(मुस्कान शेख 43, शर्वरी खिलारी 39) विजयी वि. आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजे-17 षटकांत 55/9 (शर्वरी खिलारी 3-7,वैष्णवी सिंग 3-15). सामनावीर:शर्वरी खिलारी.




























































