
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात मँचेस्टर येथे होणारा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रद्द करण्यात आला. कोविड-19 चा वाढता धोका पाहता हा सामना रद्द करण्यात आल्याचे बीसीसीआय आणि ईसीबीने स्पष्ट केले. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आयपीएलला फायदा पोहोचवण्यासाठी हा सामना रद्द केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे ज्यूनिअर फिजिओ योगेश परमार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर हिंदुस्थानच्या सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पाचवा कसोटी सामना वेळेत सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच नाणेफेकीपूर्वी बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठका झाल्या. त्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला.
या कसोटीनंतर मायकल वॉन याने ‘द टेलिग्राफ’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे सर्व आयपीएल आणि पैशांसाठी करण्यात आले. खेळाडूंना कोरोना संक्रमित होण्याची आणि त्यामुळे आयपीएलला मुकण्याची भीती वाटत होती, त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करम्यात आला. एका आठवड्यात आयपीएल सुरू होईल आणि खेळाडू आनंदात इकडून-तिकडे पळताना दिसतील. परंतु हिंदुस्थानी खेळाडूंनी आरटीपीसीआर चाचणीवर विश्वास दाखवायला हवा होता. या विषाणूबाबत आता आपण सर्व काही जाणून असून याचा योग्य पद्धतीने सामना केला जावू शकतो.’
मला याचे आश्चर्य वाटते की मँचेस्टर कसोटी सामना खेळण्यासाठी हिंदुस्थानचा संघ आपल्या 20 सदस्य संघातून 11 खेळाडू मैदानात उतरवू शकला नाही. काही खेळाडूंना हा सामना खेळायचा नसेल तर ठीक आहे. परंतु हिंदुस्थानने आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायला हवा होता. कारण ऑस्ट्रेलियानमध्ये हिंदुस्थानने अनेक रिझर्व्ह खेळाडूंच्या बळावर विजय मिळवला होता, असेही वॉन म्हणाला.
गुरुवारी रात्री हिंदुस्थानी संघाच्या खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली तेव्हाच या लढतीला हिरवा कंदिल मिळाला होता. क्रिकेट जिवंत राखण्यासाठी हा सामना आवश्यक होता. मालिका रंगतदार अवस्थेत आली होती. मात्र नाणेफेकीच्या 90 मिनिटे आधी सामना रद्द केला गेला हे योग्य झाले नाही, असेही वॉनने आपल्या लेखात म्हटले.




























































