
सामना प्रतिनिधी, पुणे
दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने प्रतिलिटर पाच रुपये थेट अनुदान द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उद्यापासून बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र आजपासूनच आंदोलन सुरू झाले. सांगली जिह्यातील कासेगाव येथे दुधाचा टँकर फोडून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आले तर अमरावतीत दुधाचा टँकर जाळला. मुंबईला होणारा दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पहिल्या दिवशी दूधपुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नसला तरी दुसऱ्या दिवशी मात्र तुटवडा भासणार आहे.
राज्यातील अनेक दूध संघ उद्या दूध संकलन करणार नाहीत, तसेच त्यांची वाहतूक थांबविणार आहे. राज्यात दुधाचे दर कोसळले असून सध्या १५ ते २० रुपये लिटरने दूध खरेदी होत आहे. असे असताना राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी दूध भुकटी उत्पादकांना पन्नास रुपये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले आहे. भुकटी उत्पादकांऐवजी कर्नाटक राज्याप्रमाणे थेट उत्पादकाला पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेची आहे. खासगी भुकटी प्रकल्पांनी गेल्या काही महिन्यांत स्वस्तात दूध खरेदी करून भुकटी केली. त्या भुकटीला अनुदान दिले जात आहे, मात्र त्याचा दूध उत्पादकांना काडीचाही फायदा नसल्याने थेट अनुदानाशिवाय बंद मागे घेणार नाही अशी ठोस भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
दूध बंद आंदोलनाला रात्रीच सुरुवात झाली असून विदर्भात अमरावती, वरुड येथे दुधाचा टँकर जाळण्यात आला. आंदोलनात फूट पाडण्यासाठी काल रात्री खासगी भुकटी उत्पादक संघाच्या मालकांनी पुण्यात बैठक घेऊन दुधाला तीन रुपये प्रतिलिटर दर वाढवून देण्याची घोषणा केली, मात्र त्याचा काहीही परिणाम आंदोलनावर झालेला नाही. दूध दरवाढीचा कोणताही फॉर्म्युला आमच्याकडे आलेला नाही. तसेच अशी वाढ देण्याचा सरकारी निर्णय नसल्याने तसेच दूध उत्पादकाला थेट अनुदान मिळावे ही मुख्य मागणी असल्याने ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. असा पवित्रा शेट्टी यांनी घेतला आहे.





























































