ऑस्ट्रेलियाचा माइंड गेम; खेळपट्ट्यांविषयी जाहीर नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ कसोटी मालिकेसाठी हिंदुस्थानच्या खडतर दौऱयावर रवाना झाला आहे, मात्र हिंदुस्थानात पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांनी नेहमीप्रमाणे माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. तिकडे सराव सामना आणि मुख्य सामन्यात मुद्दाम वेगळ्या खेळपट्टय़ा वापरल्या जातात, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे हिंदुस्थान दौऱयात सराव सामना नाही तेच बरे आहे, असा आरोप ऑस्ट्रेलियन संघाकडून करण्यात आला.

हिदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान 4 सामन्यांची गावसकर-बॉर्डर कसोटी मालिका होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये उभय संघांत पहिला कसोटी सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रमवारीत अव्वल, तर हिंदुस्थानी संघ दुसऱया स्थानी आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठीही ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बंगळुरूत सराव शिबीर

ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थान आल्यावर आधी बंगळुरूतील अलूर येथे चारदिवसीय सराव शिबिरात घाम गाळणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) देखरेखीखाली हे सराव शिबीर होणार आहे. टीम इंडियाचे सराव शिबीर नागपूरमध्ये होणार आहे.