एसटी स्थानकात होणार मिनी थिएटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना विशेष प्रतिनिधी । मुंबई

दररोज ६७ लाख प्रवाशांना सुरक्षितपणे ने-आण करणाऱया एसटी महामंडळाची स्थानके लवकरच कात टाकणार आहेत. बसस्थानकांचे नूतनीकरण करून त्यांचा दर्जा वाढविला जाणार आहे, तर निवडक मोठय़ा स्थानकांत ६० आसनांची मिनी थिएटर्स बांधण्यात येणार आहेत. यासाठी महामंडळ तब्बल १२५ कोटी रुपये खर्च करणार असून नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ७९ बसस्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाची राज्यभरात ६०९ बसस्थानके आहेत. त्यापैकी ५६८ बसस्थानके सध्या वापरात आहेत. या बसस्थानकांतून दररोज हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते, परंतु गेली अनेक वर्षे जवळपास महामंडळाच्या स्थापनेपासूनच या बसस्थानकांची ना दुरुस्ती झाली ना रंगरंगोटी केली. त्यामुळे बहुसंख्य बसस्थानकांना बकाल स्वरूप प्राप्त झाले. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुसंख्य बसस्थानके व तेथील स्वच्छतागृहाच्या सुमार दर्जामुळे येथील प्रवासी कायमस्वरूपी त्रस्त झालेले दिसतात. याबाबत अनेकवेळा विधिमंडळात चर्चाही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाची स्थानके व परिसर आता ‘कात’ टाकणार म्हणजेच स्वच्छ होणार आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या विशेष प्रयत्नांतून एसटी महामंडळाने या बसस्थानकांच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि दर्जावाढीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ७९ बसस्थानकांच्या कामास सुरुवात झाली असून यात कोकणातील महाड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा या स्थानकांचा समावेश आहे. आणखी २९ बसस्थानकांच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून यासाठी शासनाकडून ४० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेनुसार सर्व बसस्थानकांना एकाच विशिष्ट रंगसंगतीमध्ये रंगविण्यात येणार आहे.

६० आसनांचे मिनी थिएटर
-प्रवाशांना विविध सेवा देण्यासाठी मिनी थिएटर्स बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. ही मिनी थिएटर्स ६० आसनांची असतील आणि या थिएटर्समध्ये प्रामुख्याने जुने-नवे अभिजात मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
-एसटी महामंडळाच्या बसस्थानकावरील स्वच्छतागृह म्हणजे दुर्गंधीचे ठिकाण. यामुळे महामंडळाची मलीन झालेली प्रतिमा दूर करण्यासाठीच C.S.R. फंडातून ही प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत. यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीने ४.९ कोटी रुपये दिले असून त्यातून राज्यातील २२ स्वच्छतागृहे नव्याने बांधण्यात येणार आहेत.