
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठा आरक्षणाचे विधेयक राज्य सरकार येत्या दोन दिवसांत सभागृहासमोर आणणार असतानाच महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. दीड तास त्यांच्यात चर्चा झाली. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्या, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडल्याची माहिती शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच अन्य समाजांच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, त्याचप्रमाणे अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचे विधेयक सभागृहात मांडावे, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा असून त्यासह अन्य समाजाच्या मागण्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि सकारात्मकतेने हा प्रश्न सोडवावा, अशा महत्त्वपूर्ण सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांच्या सोबत दीड तास चर्चा झाली असून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत आश्वासन दिले असल्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. बुधवारी सकाळीही उपसमितीची बैठक होणार असून मराठा आरक्षणावर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.






















































