गुजरात – 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण, 8 वर्षांत 15 जणांना बायको म्हणून विकलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात येथे 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिला 8 वर्षांमध्ये 15 जणांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. मानवी तस्करी करणाऱ्या एका टोळीने पीडितेला सुमारे 2 ते अडीच लाख रुपयांना विकल्याचं उघड झालं आहे. आतापर्यंत अशा आठ जणींना त्यांनी विकल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे.

अहमदाबाद येथील कंभा गावातून एका मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर या गुन्ह्याला वाचा फुटली आहे. तिचा तपास करताना गुजरात पोलिसांनी मानवी तस्करी करणारं रॅकेट शोधून त्यातील काहींना अटक केली. त्यानंतर त्यांनी आपल्या कृष्णकृत्यांचा पाढा पोलिसांसमोर वाचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशा (नाव बदललेले) या 13 वर्षांच्या मुलीला आठ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पळवण्यात आलं होतं. अशोक पटेल नावाच्या तस्कराने तिला पळवून तिच्यावर बलात्कार केला, तिला मारहाण करून तिला वर्षाला 2 पुरुषांशी लग्न करण्याची सक्ती करण्यात आली. सहा सहा महिन्यांच्या फरकाने तिचा विवाह दुसऱ्या पुरुषाशी लावला जात होता, अशी माहिती मिळत आहे.

निशाला गेल्या आठ वर्षांत सुमारे 15 जणांना विकण्यात आलं. त्यांच्याकडून दोन ते अडीच लाख रुपये उकळण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसंच, तिच्यासारख्या अनेक मुलींचा शोध सुरू असून निशासह या गँगने राजस्थान, महाराष्ट्र भागातल्या 15 मुलींना अशाच प्रकारे पळवून विकल्याची माहिती मिळत आहे.