अपहरणकर्त्या टोळीकडून नवजात बालिकेची खरेदी,सरकारी पक्षाच्या अपयशामुळे आरोपीची जामिनावर सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अडीच महिन्यांच्या नवजात बालिकेचे अपहरण करणाऱया टोळीकडून तीन लाख रुपयांमध्ये बालिकेची खरेदी करणाऱया आरोपीला सरकारी पक्षाच्या अपयशामुळे जामीन मंजूर झाला. आरोपपत्र दाखल करण्यात झालेल्या विलंबावर बोट ठेवत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी भीमसाप्पा शनिवारची जामिनावर सुटका केली. आरोपीविरोधात 90 दिवसांत आरोपपत्र का दाखल केले नाही, अशी विचारणा करीत न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या वर्षी 26 ऑक्टोबर रोजी दक्षिण मुंबईतील फुटपाथवर राहणाऱया एका कुटुंबातील नवजात अर्भकाचे अपहरण केल्याप्रकरणी मोहम्मद हनिफ व त्याची पत्नी आफरीन या जोडप्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दोन दिवसांनी 28 ऑक्टोबर रोजी नवजात बालिकेची सुटका केली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्वतः बालिकेला पालकांच्या ताब्यात दिले होते, मात्र मुख्य आरोपी संतोष धुमाळे याने बालिकेचे अपहरण केले होते व तीन लाख रुपयांत त्या बालिकेची विक्री केली होती, असे अधिक तपासात उघड झाले होते. वास्तविक आफरीन हिच्यावर आयव्हीएफ उपचार सुरू आहेत व तिला एक मूल हवे आहे, असे न्यायालयाला कळवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता महानगर दंडाधिकारी एस. जी. कोरे यांनी आफरीन हिचा पती भीमसाप्पा शनिवारची 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि काही अटींवर सुटका केली. मुख्य आरोपीने बालिकेला दत्तक घेण्यासाठी ती बालिका आपल्याकडे सुपूर्द केली असा आफरीनचा समज होता, असे ऍड. तृप्ती शेट्टी यांनी सांगितले. या प्रकरणात न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी घाईघाईने बुधवारी सायंकाळी आरोपपत्र दाखल केले, मात्र आरोपपत्र दाखल केलेल्या विलंबावरून पोलिसांना फटकारत न्यायालयाने भीमसाप्पाला जामीन मंजूर केला.