परप्रांतीयांना रान मोकळं अन् आमच्यावर दडपशाही, मराठी असणं गुन्हा आहे का? महाराष्ट्र एकीकरण समितीचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मीरा-भाईंदर येथील ‘मराठी मोर्चा’ला परवानगी नाकारण्यात आली आणि पोलिसांनी दडपशाही करत मराठी प्रेमींवर कारवाई सुरू केली. अनेकांना नोटीस बजावण्यात आली, नजरकैदेत ठेवण्यात आले, तर काहींना ताब्यातही घेण्यात आले. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. परप्रांतीयांना मोर्चासाठी परवानगी देण्यात येते मग आमच्यावर दादागिरी आणि दडपशाही का? मराठी असणं आमचा गुन्हा आहे का? असा खडा सवाल महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

परप्रातीयांचे अनेक मोर्चे निघाले. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांना कधी नोटीस दिला नाही, त्यांच्या घरी कधी पोलीस गेले नाहीत. परंतु आमच्या शिलेदारांना, मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. त्यांना घरातून उचलून नेले जात आहे. मराठी राज्यात मराठीसाठी आंदोलन करणे हेच दुर्दैव आहे. परंतु आम्ही मराठी माणसं एकत्र येतोय, एकजूट होतोय त्यामध्ये इतकी अडचण कुणाला आहे? असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी केला.

अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई

मीरा-भाईंदरमधील मोर्चाचे सर्व फलक उतरवण्यात आले आहेत. शेकडोंना नोटीस देण्यात आली. पोलीस घरोघर जाऊ उचलून नेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार आम्ही नक्की मराठी राज्यात आहोत ना? स्वातंत्र्य मिळाले आहे की नाही देशाला? मराठी माणसे एकत्र का येऊ द्यायचे नाहीत? मराठी एकजूट का नकोय तुम्हाला? कोणासाठी आमच्यावर दादागिरी आणि दडपशाही? मराठी अस्मितेची ही चळवळ तुम्हाला का नकोय? मराठी माणसे एकवटणार हे कोणाच्या डोळ्यात सळतेय? आम्ही सामान्य माणसे, आमची कोणाला भीती आहे? असा सवालही गोवर्धन देशमुख यांनी केला.