येत्या निवडणुकीत जनता गद्दारांचे डिपॉझिट जप्त करेल – बाबूराव माने यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीनंतर वेगळ्या उंचीवर असेल, असा जबरदस्त विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघातील पक्ष निरीक्षक, माजी आमदार बाबूराव माने यांनी व्यक्त केला. सत्तेच्या मोहापायी गद्दारांनी निष्ठा -तत्वप्रणाली विसर्जित करून विचार गहाण ठेवल्याने आगामी निवडणुकीत जनता त्यांचे डिपॉझिट जप्त करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या उपक्रमातून बाबूराव माने सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेचे विचार जाणून घेत आहेत. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नेर येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक शहरी व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत. शिवसैनिकांसोबतच युवक, सुशिक्षित वर्ग, कष्टकरी, मराठा, ओबीसी व एससी, आदिवासी, भटके, अल्पसंख्याक अशा विविध जाती-धर्मातील लोक शिवसेनेच्या छायेखाली मोठय़ा प्रमाणात बांधणी करत आहेत. सर्वांना सामावून घेण्याची धमक शिवसेनेमध्ये आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी निर्माण केलेले जाळे मजबूत आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रमात शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम, अमोल आवळे, श्याम रोकडे, युकराज पाटील, दिलीप गायकवाड, रमेश बोराटे, भानुदास कोरडे, हणमंत चकरे नागरिकांचे विचार आणि अडचणी जाणून घेत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.