
सामना प्रतिनिधी । नांदेड
पैनगंगा नदीवर दहा बंधारे बांधण्याचा संकल्प आपण केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे, अ शी माहिती हदगाव,हिमायतनगर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी या परिसरातील दुष्काळ, पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी या बंधाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वर्षभरात दुसऱ्यांदा आपल्या मतदारसंघात येत असल्याने या मतदारसंघाचे उरलेले प्रश्न काही दिवसातच मार्गी लागतील, अशी आशाही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शनिवारी हदगाव, हिमायतनगर मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे येणार आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्तांच्या भेटीत त्यांनी अनेकांना दिलासा दिला. शालेय विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी जनता यांच्याशी संवाद साधला. या भागातील बंधाऱ्यांचा प्रश्न आपण त्यावेळी देखील मांडला होता त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून, लेखी पत्र देऊन विशेष बाब म्हणून पैनगंगा नदीवरील बंधारे मार्गी लावण्यासाठी हातभार लावला आहे. निश्चितच येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न मार्गी लागून या भागातील दुष्काळ तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेली अनेक वर्ष रस्ते नसलेल्या गावांना जोडण्याचे काम आपण आपल्या काळात केल्याचे सांगून नकाशावर नसलेल्या गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्यास आपल्याला यश आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण तसेच अन्य महत्वाच्या सुविधांशी मोठी शहरे जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. वाडी, तांड्यापर्यंत विकासाची गंगा नेताना तेथे आरोग्य सुविधा, रस्ते,पाणी आदी प्रश्न मार्गी लावले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात तसेच पिकविम्यासंदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आपण प्रयत्न केला असून, येणाऱ्या काळात शुध्द पेयजल मिळावे यासाठी दोनशे कोटींचा प्रकल्प आपल्या मतदारसंघात येणार आहे, यामुळे जवळपास 110 गावातील पाणीटंचाई दूर करत शाश्वत व शुध्द पाणी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांची जोडणी, नद्यावरील बंधारे, अन्यायग्रस्त शेतकरी यासंदर्भात आपण नेहमीच आग्रही राहिलो असून, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
































































