मुंबईस्थित सिंधुदुर्ग वासियांनी संयम ठेवा, 14 एप्रिलपर्यंत मुंबईतच रहा

मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असलेल्या मुंबईस्थित चाकरमान्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमानी मिळेल त्या मार्गाने कोकणात आपल्या गावी येण्याचा प्रयत्न करत असून या मुंबईस्थित सिंधुदुर्गवासियांनी संयम ठेवावा आणि 14 एप्रिलपर्यंत मुंबईतच रहावे, कोणाही ग्रामस्थांनी तुम्हाला गावबंदी केलेली नाही अथवा सिंधुदुर्गात येण्यास विरोध केलेला नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

वैभव नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत नोकरी व्यवसायानिमित्त मुबंईत वास्तव्यास असणारे सिंधुदुर्ग जिल्हयातील अनेक लोक मुंबई येथे अडकून पडले आहेत. त्यांची संख्याही खूप आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईस्थित चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण गावी येण्यासाठी प्रयत्न करत आहात, अनेक लोकांशी संपर्क साधत आहात. आपणास सिंधुदुर्गात येण्यास सिंधुदुर्गवासीयांनी बंदी आणली असा आपल्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. परंतु सिंधुदुर्गवासियांनी सिंधुदुर्गात येण्यास कोणालाही विरोध केलेला नाही अथवा गावबंदी केलेली नाही. लॉकडाऊनच्या आधी सुमारे 22 हजार लोक गावामध्ये दाखल झाले आहेत. त्या सर्वांची नोंद प्रशासनाकडे आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊन नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक जिल्हयाला लॉकडाऊन केलेले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत. त्यामुळे 14 एप्रिल पर्यंत आपल्या गावी असलेल्या नातेवाईकांच्या, आईवडिलांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व माझ्याशी संपर्क साधावा. सध्या रेल्वे, बस तसेच खाजगी वाहतूक देखील बंद आहे. लॉकडाऊन परिस्थितीत अनेक लोकांनी महामार्गावरून गावी येण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ही वाटेतच अडकले आहेत. त्यामुळे मुंबईस्थित असलेल्या सिंधुदुर्गवासियांनी 14 एप्रिल पर्यंत मुंबईतच थांबावे.

तुमच्या प्रमाणेच आमचेही बहीण, काका व इतर नातेवाईक मुंबईत अडकले आहेत. त्यामुळे कोणाही घाबरून जाऊ नये. मुंबईत काही अडचणी आल्यास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधावा. मुंबईत ते आपल्याला आवश्यक ती मदत करतील. त्याचबरोबर गावच्या लोकांबद्दल गैरसमज करू नये. खरंतर या परिस्थितीत गोवा व कोल्हापूर येथील वैद्यकीय सेवा देखील लॉकडाऊन झाली आहे. जिल्हयात येणाऱ्या आवश्यक सुविधांपैकी दूध, भाजीपाला हे देखील मर्यादित स्वरूपात आहे. एक कोरोना रुग्ण मुंबई वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात आल्यामुळे त्या पंचक्रोशीतील अनेक गावांतील घराघरांची तपासणी सुरु आहे. त्यामुळे प्रशासनावर याचा मोठा ताण पडत आहे. काही कालावधीनंतर निश्चित ही परिस्थिती सुधारेल. त्यामुळे लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत आपण ज्याठिकाणी आहात त्या ठिकाणीच थांबावे. मुंबई आणि सिंधुदूर्गाचे नाते हे अतूट आहे. वेळोवेळी मुंबईकरांनी सिंधुदुर्ग जिल्हयाला जी मदत केली आहे ती आम्ही कधीही विसरु शकत नाही. त्याबद्दल जराही मनात शंका आणू नये. कोरोनाच्या संसर्गापासून आपणा सर्वांना वाचविण्यासाठी शासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या नियमांचे पालन करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, असे आ. नाईक यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या